'या' देशात सत्तापालट, बंडखोरीस नकार दिल्यामुळे लष्करानं पंतप्रधानांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:54 PM2021-10-25T14:54:46+5:302021-10-25T14:54:55+5:30
लष्कराने पंतप्रधानांसह काही उच्च अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आणि एका अज्ञात स्थळी नेले आहे.
खारतूम: उत्तर आफ्रिकन देश सुदानमध्ये राजकीय आणि आर्थिक संकट गडद होत आहे. सरकारच्या निर्णयांमुळे संतप्त लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. यातच लोकांनी सैन्याकडे बंडाचे आवाहन केले होते, यानंतर सुदानचे पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी पंतप्रधान तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना सध्या एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे.
रॉयटर्सच्या माहतीनुसार, सुदानच्या सूचना मंत्रालयाने पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना सोमवारी सशस्त्र दलांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी बंडाचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा सैन्य दलाने पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अज्ञात ठिकाणी नेले.
सुदानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराने सोमवारी किमान पाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आहे. तसचे, लोकशाही समर्थक सुदानचा मुख्य पक्ष असलेल्या सुदानीज प्रोफेशनल्स असोसिएशनने जनतेला संभाव्य लष्करी बंडाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलं आहे.