इथिओपियामध्ये सत्तापालटाचा प्रयत्न; सेनाध्यक्षासह प्रांताध्यक्षाची गोळी झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 10:21 PM2019-06-23T22:21:03+5:302019-06-23T22:21:53+5:30
इथिओपियामध्ये सेनाध्यक्षांसह अमहारा प्रांताच्या अध्यक्षाची वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
इथिओपियामध्ये सेनाध्यक्षांसह अमहारा प्रांताच्या अध्यक्षाची वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही हल्ले अमहारामध्ये सत्तापालट करण्यासाठी करण्यात आले होते. या हल्ल्यात एकूण चार जण ठार झाले आहेत. तेथील पंतप्रधान कार्यालयाने सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे सांगितले आहे.
पहिल्या हल्ल्यामध्ये अमहाराचे अध्यक्ष एंबाचेव मेकॉनन यांच्यासह सल्लागाराची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात या प्रांताचे महाधिवक्ता गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला अमहाराची राजधानी बहिर डारमध्ये झाला.
दुसऱ्या हल्ल्यामध्ये इथिओपियाच्या सेनेचे प्रमुख सियरे मेकोनेन आणि एक निवृत्त जनरल यांना आदिस अबाबा येथील निवासस्थानी अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या. पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही घटनांना एकमेकांशी संबंध असल्याचे सांगितले आहे.
दोन्ही घटनांना अमहारा प्रांतातील सुरक्षा प्रमुख जनरल असमन्यू सीज जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनीच सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ते कुठे आहेच याबाबत यंत्रणांना काहीच माहिती नाही. असमन्यू यांनी याआधीही असेच प्रयत्न केले होते. त्यांना यामुळे अटकही करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना माफ करण्यात आले आणि एक वर्षानंतर सोडून देण्यात आले होते.