जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:37 AM2024-10-14T08:37:09+5:302024-10-14T08:37:41+5:30
पाकिस्तानमध्ये पुढील काही दिवस लग्न समारंभ, आंदोलने आदींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्य, गुप्तचर यंत्रणा आणि रेंजर्सचे जवान ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.
पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतू तेथील परिस्थिती पाहता भारत, रशिया, चीनसह विविध आशियाई देशांचे प्रतिनिधी येणार असल्याने काही अघटित घडायला नको म्हणून पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये सैन्य तैनात केले आहे.
भारताचे प्रतिनिधी मंडळ पाकिस्तानला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही काही वेळात पाकिस्तानला रवाना होणार आहेत. इराण, रशिया, चीनचे प्रतिनिधी मंडळ देखील पोहोचले आहेत. अशातच पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती ठीक नसल्याने सैन्याची तैनाती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये पुढील काही दिवस लग्न समारंभ, आंदोलने आदींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्य, गुप्तचर यंत्रणा आणि रेंजर्सचे जवान ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. ९००० पोलिसांना इस्लामाबादसह आजुबाजुच्या शहरांमध्ये तैनात करण्यात आल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले आहे.
इस्लामाबाद, रावळपिंडीसह आजुबाजुच्या शहरांत आंदोलनांना तसेच रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच माजी पंतप्रधान इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफने इम्रानविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानात काही भागात दंगे सुरु झाले आहेत. या परिस्थितीवर पोलीस प्रशासन ताबा ठेवू शकत नसल्याने आता लष्कराने ताबा घेतला आहे.