नाझी गोल्ड ट्रेनसाठी लष्कर सरसावले
By admin | Published: October 1, 2015 12:11 AM2015-10-01T00:11:13+5:302015-10-01T00:11:13+5:30
सोने आणि मौल्यवान कलाकृतींनी गच्च भरलेली नाझी ट्रेन दडवून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पोलंड लष्कराने खोदकाम सुरू केले आहे
वॉर्सा : सोने आणि मौल्यवान कलाकृतींनी गच्च भरलेली नाझी ट्रेन दडवून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पोलंड लष्कराने खोदकाम सुरू केले आहे. नैऋत्येकडील वल्ब्रझिश या शहरालगत असलेले भुयार आणि आसपासच्या भागात लष्कराने रासायनिक, किरणोत्सर्ग आणि स्फोटक तज्ज्ञ तैनात केले आहेत.
दुसरे महायुद्ध संपल्यापासून ही गोल्ड ट्रेन बेपत्ता होती. यात लुटलेले सोने आणि मौल्यवान कलाकृतींचा खजिना असल्याचे सांगण्यात येते. अँड्रियस रिश्टर आणि पिओत्र कूपर या जोडगोळीने ही ट्रेन आढळल्याचा दावा केल्यापासून या खजिन्याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी पोलीस आणि लष्कराच्या अभियांत्रिकी विभागातील सैनिक या भागात डेरेदाखल झाले असून त्यांनी या परिसराभोवती लोखंडी कठडे आणि चौक्या उभारून इतर लोकांना मज्जाव केला आहे. हाती लागलेल्या खजिन्यापैकी १० टक्के हिस्सा देण्याची मागणी अँड्रीयस रिश्टर आणि पिओत्र कूपर यांनी केली आहे. तथापि, पिओत्र कूपरने असा दावा केला की, लष्कराच्या हाती काहीही लागणार नाही. कारण ही ट्रेन जमिनीखाली आठ मीटर खोल आहे. आम्ही या ट्रेनपर्यंत कसे पोहोचता येईल, काय अडचणी येतील, याचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ खर्ची घातला आहे. तेव्हा ही सोन्याची ट्रेन आम्हालाच बाहेर काढू द्यावी. (वृत्तसंस्था)