जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:58 IST2025-04-14T12:57:20+5:302025-04-14T12:58:10+5:30

Largest gold mines vietnam: प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे.

Around the world: A 'poor' country with 500 gold mines | जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

समजा तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही मला एक हजार रुपये द्या, मी त्याचे थोड्याच वेळात तुम्हाला तीन लाख करून देतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल? अर्थात, आपल्याकडं असे अनेक भामटे दिसतात, जे लोकांना अशीच काही आमिषं दाखवून त्यांना लुबाडत असतात. तुमचे पैसे दुप्पट करून देतो, महिन्याला दहा टक्के व्याज देतो, अत्यंत कमी पैशांत महागड्या वस्तू देतो... असं सांगून लुबाडणाऱ्या लोकांची आणि ‘स्कीम्स’ची एकामागून एक रांग लागलेली आपल्याला दिसते. ‘एक हजार रुपयांचे तीन लाख देतो’ ही त्यातलीच एखादी ‘स्कीम’ नाही, तर ही वास्तवातली गोष्ट आहे.
 
ज्या देशांचं चलन अत्यंत कमजोर आहे, त्यात व्हिएतनाम हा देश मोडतो. भारतीय चलनातील हजार रुपये व्हिएतनामी चलनाच्या तीन लाख ‘डोंग’इतके आहेत इतकं व्हिएतनामचं चलन कमजोर आहे. असं असलं तरी या देशाला एक अत्यंत वैभवशाली वारसा आहे, तो म्हणजे या देशात सोन्याच्या मोठमोठ्या खाणी आहेत. 

प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे असलेल्या या सोन्याच्या हॉटेलचं नावही ‘गोल्डन लेक’ असंच आहे. या हॉटेलला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. २५ मजली या हॉटेलमध्ये ४०० खोल्या आहेत. 

या हॉटेलमध्ये सगळं काही सोन्याचं आहे. सोन्याचे दरवाजे, सोन्याच्या खिडक्या, सोन्याचे नळ, इतकंच काय या हॉटेलमधली शौचालयंही सोन्याची आहेत! सिंगापूर बुलियन मार्केटच्या अहवालानुसार २०२१ मध्ये आशिया खंडातील सोन्याचा सर्वांत मोठा बाजार व्हिएतनाममध्ये होता. 

इथल्या सोन्याचा साठा दिवसेंदिवस वाढतोच आहे आणि आता तर चक्क तिथे सोन्याच्या चाळीस खाणी सापडल्या आहेत. त्यांत किमान तीस टन सोनं असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आमच्या आर्थिक अडचणी आणि इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी या सोन्याचा आम्हाला उपयोग होईल, असं व्हिएतनामी राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

व्हिएतनाममध्ये जागोजागी सोन्याच्या खाणी आहेत. त्यातही बाक, कान, तुयेन क्वांग या प्रांतात आठ, लाई चाऊ प्रांतात पाच, थान होआ आणि नघे अन या प्रांतात चार, लांग सॉन आणि काओ बँग येथे तीन हा जिआंग आणि येन बाई येथे दोन, तर दिएन बिएन इथं एक.. अशा सोन्याच्या अनेक मोठ्या खाणी इथं आहेत. 

याशिवाय इतरही अनेक ठिकाणी सोन्याच्या लहान-मोठ्या खाणी आहेत. 

एका अंदाजानुसार व्हिएतनाममध्ये सोन्याच्या ज्या खाणी आहेत, त्यात सोन्याचे तब्बल ५०० साठे आहेत. या सर्व खाणींमध्ये मिळून सुमारे तीनशे टन सोनं असल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. नुसतं सोनंच नाही, तर थेट सोन्याच्या खाणीच इथं सापडत असल्यानं व्हिएतनाम आणि संपूर्ण जगाचं या देशाकडं लक्ष लागून असतं. 

व्हिएतनाममधील सोन्याच्या खाणी मुख्यत: त्यांच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात आहेत. उरलेल्या खाणी मध्य प्रांतात आहेत. व्हिएतनामी लोकांचं म्हणणं आहे, आमच्या देशाचं चलन अत्यंत कमजोर असल्यानं त्याचा मोठा फटका आम्हाला बसतो; पण आमचा देश ‘सोन्याचा’ आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे!..

Web Title: Around the world: A 'poor' country with 500 gold mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.