जगभर: अमेरिकन प्रेयसी, पाकिस्तानी प्रियकर; तो १९ वर्षांचा अन् ती ३५ वर्षांची
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:41 IST2025-02-03T11:39:25+5:302025-02-03T11:41:07+5:30
दिवसेंदिवस या प्रेमाला बहर येत होता आणि तो ओसरायला तयार नव्हता. अर्थातच त्यांचं हे प्रेम जुळलं सोशल मीडियाच्या माध्यमातून.

जगभर: अमेरिकन प्रेयसी, पाकिस्तानी प्रियकर; तो १९ वर्षांचा अन् ती ३५ वर्षांची
तो १९ वर्षांचा. ती ३५ वर्षांची. तो पाकिस्तानी, ती अमेरिकन. तो अविवाहित, ती विवाहित. त्याला मूलबाळ असण्याचा काही संबंधच नाही, तिला मात्र दोन मुलं. तरीही त्यांचं एकमेकांवर गाढ प्रेम बसलं. जगेन तर तुझ्यासोबतच, नाही तर नाही... दिवसेंदिवस या प्रेमाला बहर येत होता आणि तो ओसरायला तयार नव्हता. अर्थातच त्यांचं हे प्रेम जुळलं सोशल मीडियाच्या माध्यमातून.
त्याचं नाव निदाल अहमद मेमन, तर तिचं नाव ओनिजा ॲण्ड्र्यू रॉबिन्स. रोज ते ऑनालाइन भेटायचे, तासनतास गप्पा मारायचे. प्रेमाच्या या पुरात अक्षरश: वाहून जायचे. पण, असं किती दिवस चालणार? ती अमेरिकेत, तो पाकिस्तानात.. निदाल तिला दिवसातून दहादा तरी सांगायचा, तू पाकिस्तानात ये, आपण लग्न करू. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तुझ्याशिवाय एक एक क्षण काढणं मला अशक्य होतंय..
तिनंही ठरवलंच शेवटी.. आता फार झालं. जायचं आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात. तिथे जाऊ आणि लग्न करू. एका नव्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करू!.. त्यासाठी तिनं घर सोडलं, आपल्या नवऱ्याला सोडलं, दोन्ही मुलांना सोडलं, आपला देश सोडला आणि विमानात बसून ती पाकिस्तानात पोहोचली.
दोघंही एकमेकांना भेटायला अतिशय आतूर झाले होते. केव्हा एकदा आपण भेटतो असं त्यांना झालं होतं. कराची विमानतळावर उतरताच घाईघाईनं ओनिजा निदालला भेटायला गेली. पण.. दोघांची भेट होताच निदालनं तू कोण आणि मी कोण.. म्हणत कानावर हात ठेवले.
मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही म्हणून तिला तसंच सोडून दिलं! कारण काय? - निदाल म्हणतो, आधीच लग्न झालेल्या, त्यात दोन मुलं असलेल्या, शिवाय अमेरिकन महिलेशी तुला या जन्मात लग्न करता येणार नाही, असा दम माझ्या पालकांनी दिल्यामुळे मला तिच्याशी लग्न करता येणार नाही.
निदालच्या या निर्णयामुळे ओनिजा मात्र उद्ध्वस्त झाली. ज्या प्रियकरासाठी आपण घर सोडलं, नवरा सोडला, दोन मुलांना सोडलं, आपला देश सोडला, तोच प्रियकर ऐनवेळी इतका पलटेल यावर तिचा विश्वासच बसेना. आपल्या मूर्खपणामुळे स्वत:लाच तिनं शिव्यांच्या लाखोल्याही वाहिल्या, पण आता रडून, शोक करून काहीच उपयोग नव्हता!..
दुसऱ्या देशात आल्यावर, प्रियकरानं वाऱ्यावर सोडल्यावर तीही सैरभैर झाली. अक्षरश: वेड्यागत तिची अवस्था झाली. खरं तर ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच ती पाकिस्तानात आली होती. पण प्रियकरानं ठोकरल्यावर अशीच इकडे तिकडे भ्रमिष्टासारखी फिरत होती.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ता आणि यूट्यूबर झफर अब्बासला तिची माहिती मिळाल्यानंतर त्यानं सोशल मीडियावर ही स्टोरी शेअर केली. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांशी बोलून तिला मदत मिळवून देण्याचाही प्रयत्न केला. या अधिकाऱ्यांनीही अमेरिकन वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधून तिच्या परतीची, घरवापसीची व्यवस्था केली, पण त्यानंतरही कराची विमानतळावर तिनं गोंधळ घातला.
तिला एकतर अमेरिकेत जायचंच नव्हतं. मला ५० हजार अमेरिकन डॉलर्स द्या, पाकिस्तानी नागरिकत्व द्या म्हणून ती हटून बसली होती..