जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:08 IST2025-04-19T09:02:16+5:302025-04-19T09:08:32+5:30

हिवाळ्यात भारतातल्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या बातम्या येतात. हे प्रदूषण नागरिकांच्या जीवावर कसं बेतणार आहे, हे तज्ज्ञ मंडळी सांगतात

Around the world: Breathe freely and pollution-free, 500 streets in Paris are just for walking! | जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!

जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!

घराबाहेर पडताना आपलं स्वतःचं वाहन घेऊन बाहेर पडणं हे कितीही सोयीचं असलं तरी त्याचे दूरगामी परिणाम सहसा चांगले नसतातच. प्रत्येकानेच आपलं वाहन रस्त्यावर आणलं की, त्याचा परिणाम म्हणून हवेतलं प्रदूषण वाढतं. बहुतेकवेळा आपण श्वासावाटे शुद्ध हवा नाही तर प्रदूषणच शरीरात घेत असतो, हे जाणवतंही. 

हिवाळ्यात भारतातल्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या बातम्या येतात. हे प्रदूषण नागरिकांच्या जीवावर कसं बेतणार आहे, हे तज्ज्ञ मंडळी सांगतात; पण त्यातून फार काही निष्पन्न होतंच असं नाही. जगातील अनेक शहरांनी जीवघेण्या हवा प्रदूषणाचा हा अनुभव कधी ना कधी घेतला आहे. फ्रान्सची राजधानी असलेलं पॅरिस हे शहरही त्यातलंच एक; मात्र फ्रान्सने त्यातून धडा घेतला, हातपाय हलवले आणि त्याची गोड फळं फ्रेंचांना आता चाखायला मिळत आहेत. 

आपण श्वासातून शुद्ध हवा नाही तर प्रदूषण शरीरात घेतोय हे लक्षात आल्यानंतर फ्रान्सने तातडीने हातपाय हलवायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून पॅरिस शहरातल्या हवेतील प्रदूषकांची संख्या २००५ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या २० वर्षांमध्ये सुमारे ५५ टक्क्यांनी घटल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे. नायट्रोजन डाय ऑक्साइड या घातक घटकाचं प्रमाणही या वीस वर्षांत सुमारे ५० टक्क्यांनी कमी झालं म्हणजे निम्म्यावर आलं. 

एअरपॅरीफ नावाच्या एका समूहाने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पॅरिसच्या हवेत नायट्रोजन डाय ऑक्साइडचा आलेख प्रचंड उंचावला होता; मात्र प्रदूषण, त्यातही हवेचं प्रदूषण हे ‘सायलेंट किलर’ असल्याचं तातडीने ओळखून पावलं उचलल्यामुळे पॅरिसची जनता आता खरोखरच मोकळा श्वास घेते आहे. हे कसं घडलं? मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आणि धोरणं यांच्या मदतीनेच हे शक्य झालं आहे.  

‘ॲन हिदाल्गो’ या २०१४ पासून पॅरिसच्या महापौर आहेत. पॅरिस सध्या घेत असलेल्या मोकळ्या श्वासाचं बरंचसं श्रेय त्यांना जातं. ॲन यांच्या नेतृत्वाखाली पॅरिस शहरातले सुमारे ५०,००० पार्किंग लॉट काढून टाकण्यात आले. 

‘एसयूव्ही’सारख्या मोठ्या वाहनांच्या पार्किंगचं शुल्क जवळजवळ तिप्पट करण्यात आलं. ‘रू दे रीवोली’ या भागात खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणात बंदी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. सीन नदीकाठचा लांब-रुंद पट्टा त्यांनी पादचारी मार्ग म्हणून घोषित केला. त्याचा अपेक्षित परिणाम स्थानिक जनतेला अनुभवायला मिळाला. त्यामुळे अगदी मागच्याच महिन्यात फ्रेंच नागरिकांनी शहरातले आणखी ५०० रस्ते हे पादचारी मार्ग करण्याच्या बाजूने आपला कौल दिला आहे. 

कोणताही बदल करायचा तर त्यासाठी स्थानिक नागरिकांचं सहकार्य हवंच. सगळेच काही सहकार्य करण्याच्या विचारांचे नसतात. मतभेद हे असायचेच. फ़्रेंच नागरिकही त्याला अपवाद नाहीत.

सरकारने ही धोरणं आखल्यापासून जगणं अवघड झाल्याचं काही प्रवासी, वाहनचालक आणि प्रामुख्याने उजव्या विचारांच्या राजकारण्यांचं मत आहे; पण धोरणातील हे बदल हे सगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हिताचे असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. थोडक्यात, मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास घ्यायचा असेल तर त्यासाठी कठोर धोरणं आखणं आणि त्यांची तितकीच कठोर अंमलबजावणी करणंही महत्त्वाचं असल्याचं पॅरिसच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

Web Title: Around the world: Breathe freely and pollution-free, 500 streets in Paris are just for walking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.