जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:08 IST2025-02-04T08:07:31+5:302025-02-04T08:08:07+5:30

आताही तेच घडलं आहे आणि घडतं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. उदाहरणादाखल एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची जनक कंपनी मेटा.

Around the world: Pay Donald Trump, settle the matter! | जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

डोनाल्ड ट्रम्प आता अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्याआधी अमेरिकेतील बडे उद्योगपती म्हणून त्यांची ‘ख्याती’ होती. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना आणि नसतानाही म्हणजे ते ‘फक्त उद्योगपती’ होते, तेव्हापासून ज्यांनी-ज्यांनी त्यांचा ‘अनुभव’ घेतला आहे, जे त्यांना ओळखतात, ते सारेच सांगतात, ‘संधी मिळाली की ट्रम्प आपले जुने सारे हिशेब व्याजासह चुकते करतात’! म्हणून त्यांच्याशी कोणीच पंगा घेत नाही. काहींनी तसा प्रयत्न केला, पण नंतर त्यांना ट्रम्प यांच्याशी जुळवून घ्यावं लागलं.

आताही तेच घडलं आहे आणि घडतं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. उदाहरणादाखल एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची जनक कंपनी ‘मेटा’ आणि त्याचे संस्थापक मार्क झकरबर्ग. 

अमेरिकेत वॉशिंग्टन येथे ६ जानेवारी २०२१ ची घटना बहुतेकांना आठवत असेल. आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीनंतर दुसऱ्या वेळी ट्रम्प यांनी जी निवडणूक लढवली होती, त्यावेळी ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली होती; पण हा निर्णय अमान्य असल्यानं त्यांच्या समर्थकांनी त्या दिवशी अमेरिकी संसद ‘कॅपिटल हिल’वर चक्क हल्ला चढवला होता!

कोणत्याही आणि अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही देशातील ही अत्यंत दुर्दैवी घटना. सगळ्या जगातून या घटनेवर जळजळीत टीका झाली होती. यानंतर ट्रम्प यांचं पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनण्याचं स्वप्न आता धूसर होईल, असं मानलं जात होतं. या घटनेनंतर मार्क झकरबर्ग यांच्या ‘मेटा’नंडोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं अकाउंट डिलिट केलं होतं. त्यावेळी ट्रम्प यांनी झकरबर्गच्या या कृतीवर फार थयथयाट केला होता आणि त्यांनी त्यासंदर्भात कोर्टात केसही दाखल केली होती. त्याचा राग त्यांच्या मनात कायम होता. वेळोवेळी त्यांनी त्यावर टीकाही केली होती.

अगदी अलीकडेच म्हणजे निवडणूक काळात ट्रम्प यांनी ‘फेसबुक’ हे जनतेचे दुश्मन आहे, असं म्हणत त्यावर कोरडे ओढले होते. ते पुन्हा निवडून आले तर काय करतील, याविषयी साऱ्यांनाच अंदाज होता, पण ते निवडून येणार नाहीत, असाच अनेकांचा होरा होता, पण निवडणूक जसजशी जवळ येत गेली, तसतसं चित्र बदललं आणि पारडं ट्रम्प यांच्या बाजूनं झुकलं. हे पाहताच मार्क झकरबर्ग यांनीही नरमाईचं धोरण स्वीकारलं होतं आणि आता तर त्यांनी ट्रम्प यांच्याबरोबरचं हे प्रकरण न्यायालयाबाहेर ‘मिटवायचा’ निर्णय घेतला. 

‘नुकसानभरपाई’ म्हणून मार्क झकरबर्ग ट्रम्प यांना तब्बल २५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१७ कोटी रुपये) देणार आहेत. न्यूयाॅर्क टाइम्सच्या अहवालानुसार ट्रम्प यांनी यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली आहे. ज्या झकरबर्ग यांनी ‘कॅपिटल हिल’ हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्यावर जळजळीत टीका केली होती, ते झकरबर्ग ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सपत्नीक भेटायलाही गेले होते.

आणखी अशीच एक घटना. अमेरिकेच्या एबीसी न्यूज चॅनलचे अँकर जॉर्ज स्टेफानोपोलोस यांनी गेल्या वर्षी १० मार्चला लाइव्ह प्रोग्राममध्ये ‘ट्रम्प हे एका बलात्कार प्रकरणात दोषी ठरले आहेत’, असं विधान केलं होतं. त्यांच्यावरही ट्रम्प यांनी मानहानीचा दावा ठोकला होता. एबीसी न्यूज चॅनलही ट्रम्प यांना १२९ कोटी रुपये नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण मिटवणार आहे.

Web Title: Around the world: Pay Donald Trump, settle the matter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.