जगभर - पाक सुंदरी एरिकामुळे ‘पेटला’ अख्खा देश!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:56 AM2023-09-27T05:56:33+5:302023-09-27T05:57:23+5:30

मुळात ही स्पर्धा झालीच कशी, भरवली कोणी, पाकिस्तानच्या वतीनं आणि पाकिस्तानचं नाव घेऊन ही स्पर्धा भरवण्याचा आयोजकांना अधिकारच काय,

Around the world - the whole country is on fire because of Pak beauty Erica! | जगभर - पाक सुंदरी एरिकामुळे ‘पेटला’ अख्खा देश!

जगभर - पाक सुंदरी एरिकामुळे ‘पेटला’ अख्खा देश!

googlenewsNext

अभिमान वाटावा, कौतुक वाटावं, असे प्रसंग पाकिस्तान आणि त्यांच्या देशवासीयांच्या आयुष्यात क्वचितच येतात. पाकिस्तान जन्माला आल्यापासून त्यांच्या वाट्याला कायम हेटाळणीच आली आहे. अर्थात त्याला कारणीभूत ते स्वत:च आहेत. ज्या अखंड भारतापासून फुटून आपण वेगळे झालो, तो भारत आज कुठे आहे आणि आपण कुठे आहोत, याचा विषाद खुद्द पाकिस्तानी नागरिकांच्या मनातही कायम दाटलेला असतो आणि उघडपणे तो ते बोलूनही दाखवत असतात.    

काही दिवसांपूर्वी मात्र एक वेगळी घटना पाकिस्तानी नागरिकांच्या आयुष्यात घडली. या घटनेचं कौतुक करावं, त्याचा राग करावा, संताप करावा की शांत बसावं, असा संभ्रम अनेक पाकिस्तानी नागरिकांच्या मनात सध्या थैमान घालतो आहे. एरिका रॉबिन ही पाकिस्तानमधील एक २४ वर्षीय सुंदरी. पाकिस्तानी असली तरी ती  ख्रिश्चन धर्मीय आहे. अलीकडेच एक सौंदर्य स्पर्धा झाली. त्यात तिनं पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. अर्थातच ही स्पर्धा होती ‘मिस युनिव्हर्स’ या जागतिक स्पर्धेसाठीची पात्रता फेरी. जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याआधी त्या त्या देशांत आधी त्या देशापुरती स्पर्धा घेतली जाते. त्यात यशस्वी ठरणाऱ्या तरुणी मग जागतिक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. अशीच ही ‘मिस पाकिस्तान युनिव्हर्स’ स्पर्धा. पाकिस्तान हा महिलांच्या बाबतीत आधीच कट्टर आणि महिलांनी आपली ‘सीमारेषा’ ओलांडू नये, यासाठी अतिव जागरूक असलेला देश. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानची सुंदरी ठरविण्यासाठी असली तरी प्रत्यक्षात स्पर्धा झाली, ती मात्र मालदीवमध्ये. त्याचं कारणही अगदी साधं होतं. पाकिस्तानसारख्या कट्टर धर्माभिमानी आणि महिलांना कायम एका चौकटीतच पाहू शकणाऱ्या देशात या स्पर्धा लोकांना सहन होणार नाहीत, त्यांच्या पचनी पडणार नाहीत आणि त्यांना प्रचंड विरोध होईल हे लक्षात घेऊन आयोजकांनी या स्पर्धेचं आयोजनच मालदीवमध्ये केलं. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धा पार पडल्या. ही स्पर्धा म्हणजेच ‘मिस पाकिस्तान युनिव्हर्स’ ! ती जिंकली एरिका रॉबिननं. पाकिस्तानची ती पहिलीच ‘मिस पाकिस्तान युनिव्हर्स! पण याच कारणावरून पाकिस्तानमध्ये सध्या कोण गदारोळ उठला आहे!    

मुळात ही स्पर्धा झालीच कशी, भरवली कोणी, पाकिस्तानच्या वतीनं आणि पाकिस्तानचं नाव घेऊन ही स्पर्धा भरवण्याचा आयोजकांना अधिकारच काय, या आयोजकांच्या मुसक्या आवळा, असलं लाजीरवाणं आणि अश्लील कृत्य करण्याची त्यांची हिंमतच कशी झाली, त्यांना ताबडतोब तुरुंगात टाका, एरिकासारख्या ज्या पाकिस्तानी तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला, त्यांना तरी काही ‘लाज-लज्जा-शरम’ वाटावी की नाही, त्यांच्यावरही ताबडतोब कारवाई करावी आणि ही स्पर्धा तसंच त्यात दिला गेलेला किताबही रद्द करावा, या मागणीवरून पाकिस्तानात अक्षरश: रणकंदन सुरू झालं आहे. महिलांचं ‘नग्न’ प्रदर्शन करणाऱ्या अशा अश्लील स्पर्धा पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक कारवाईची तरतूद करावी, यासाठी पाकिस्तानातील कट्टर धर्मपंथी या स्पर्धेच्या विरोधात बाह्या सरसावून उभे राहिले आहेत. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवार-उल-हक काकड यांनीही या वादात उडी घेतली आहे. पाकिस्तानची इंटलिजंट एजन्सी ‘आयएसआय’ला त्यांनी आता यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात अल साल्वाडोर येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत एरिका रॉबिन आता पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करेल; पण या स्पर्धेत तिला भाग घेता येईल की नाही, पाकिस्तानची प्रतिनिधी म्हणून तिला मान्यता मिळेल की नाही याबाबतच आता  साशंकता व्यक्त केली जात आहे. 

मालदीव येथे जी सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली, त्याचं आयोजन दुबई येथील युजेन ग्रुपनं केलं होतं. याच ग्रुपनं बहारीन आणि इजिप्तमध्येही सौंदर्य स्पर्धांचं आयोजन केलं होतं. पाकिस्तानच्या अनेक धार्मिक नेत्यांनी आणि राजकारण्यांनी या सौंदर्य स्पर्धांविरुद्ध आता जाहीरपणे शड्डू ठोकले आहेत. खुद्द पंतप्रधान काकड यांनी या स्पर्धा म्हणजे देशाविरुद्धचा कट असल्याचं म्हटलं आहे. एरिकाव्यतिरिक्त हीरा इनाम, जेसिका विल्सन, मालिका अल्वी आणि शबरीना वसीम या तरुणींनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. एरिकासहित त्यांच्यावरही कारवाई होणार का, याबाबत आता तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. 

इंडोनेशियात झाला होता ‘टॉपलेस’ वाद! 
काही दिवसांपूर्वीच इंडोनेशिया येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मोठा विवाद झाला होता. स्पर्धेत भाग घेतलेल्या सहा सौंदर्यवतींनी आमच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आणि आम्हाला एका बंद खोलीत ‘टॉपलेस’ होण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला होता. इंडोनेशियातली ही सौंदर्य स्पर्धा मुथिया रेचमन या सुंदरीनं जिंकली होती; पण या विवादामुळे तिला आता अल साल्वाडोर येथे होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ या मुख्य स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

Web Title: Around the world - the whole country is on fire because of Pak beauty Erica!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.