जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:48 AM2021-06-10T08:48:26+5:302021-06-10T08:48:57+5:30

घोड्यासारखा प्राणी कधीच झोपत नाही, असं म्हटलं जातं; पण कमी वेळ का होईना उभ्या उभ्या तो झोपतोच. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून जिवांचं जगणं, झोपणं, त्यांचं आयुष्य यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. 

Around the world: After 24,000 years of sleep, 'he' a awake! | जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा!

जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा!

Next

कोणता सजीव किती काळ जीवंत राहू शकताे.. त्याचे काही सर्वसाधारण आराखडे ठरलेले आहेत. मलेशियन कासव १५० ते १६० वर्षे जगू शकतं. सर्वसाधारण कासव ८० वर्षे जगतं. हत्तीचं आयुष्यमान साधारण साठ वर्षे, चिंपांझीचे ५० ते ६० वर्षे, कुत्र्याचं २० वर्षे, तर चिमणीचं सात वर्षे आहे. आयुर्वेदाप्रमाणे माणसाचं सर्वसाधारण आयुष्यमान १०० वर्षे असायला हवं.
हे झालं प्राण्यांच्या आयुष्याबद्दल. पण, प्रत्येक प्राण्याच्या झोपेचा रोजचा कालावधीही वेगवेगळा आहे. घोड्यासारखा प्राणी कधीच झोपत नाही, असं म्हटलं जातं; पण कमी वेळ का होईना उभ्या उभ्या तो झोपतोच. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून जिवांचं जगणं, झोपणं, त्यांचं आयुष्य यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. 
रशियातील बर्फाच्छादित सैबेरियामध्ये टुंड्रा प्रदेशात एक सूक्ष्मजीव तब्बल २४ हजार वर्षांच्या झोपेतून नुकताच ‘जागा’ झाला, असा दावा रशियाच्या संशोधकांनी केला आहे. ‘बिडेलॉइड’ असं या सूक्ष्मजीवाचं नाव असून पाणी असलेल्या वातावरणात तो सर्वसाधारणपणे जीवंत राहू शकतो. अनेक सजीवांमध्ये कठीण परिस्थितीतही तगून राहण्याची क्षमता असते, त्यातला हा एक जीव आहे. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत स्वत:ला जीवंत ठेवण्याची अद‌्भुत क्षमता या जीवात आहे. रशियाच्या संशोधकांना आर्कटिक परिसरात सैबेरियात असलेल्या बर्फाळ मातीत हा सूक्ष्मजीव आढळून आला.  
रशियाच्या संशोधकांनी उत्खनन करून येथील माती संशोधनासाठी बाहेर काढली होती. या मातीतून जीवंत सूक्ष्मजीव शोधून काढलेले शास्त्रज्ञ स्टास मलाविन यांचं म्हणणं आहे, ‘काही सजीव गुप्तजीवित अवस्थेत (क्रिप्टोबायोसिस) हजारो वर्षे जीवंत राहू शकतात, या सत्याचा आमचं संशोधन म्हणजे भक्कम पुरावा आहे!’ 
याआधी प्रसिद्ध झालेल्या संशोधनात सूक्ष्मजीव सुप्तावस्थेत जास्तीतजास्त दहा वर्षे जगू शकतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. तो समज या नव्या संशोधनाने खोडून काढला आहे.  हा सूक्ष्मजीव गेल्या २४ हजार वर्षांपासून जीवंत असल्याचा शोध रशियाच्या संशोधकांनी रेडिओकार्बन डेटिंगच्या मदतीनं लावला आहे. ज्या ठिकाणच्या बर्फाळ मातीत हा सूक्ष्मजीव आढळून आला तो परिसर वर्षभर बर्फाच्छादित असतो. वर्षाचे बाराही महिने तिथे बर्फ असतो. विज्ञानविषयक जर्नल ‘करंट बायॉलॉजी’मध्ये नुकतंच हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. अर्थात अशा प्रकारचं संशोधन ही नवीन बाब नाही. यापूर्वीही संशोधकांनी बऱ्याच वेळा सुप्तावस्थेतील सूक्ष्मजीवांचा आणि त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला आहे.  
आताच्या नव्या अहवालात संशोधकांनी म्हटलं आहे, आर्क्टिक परिसरात वाढलेल्या उष्णतेमुळे सध्या तिथला बर्फ वितळतो आहे. पश्चिम सैबेरिया परिसरात हे प्रमाण जास्त आहे. कायमस्वरूपी असलेल्या बर्फाचा वरचा स्तर जेव्हा वितळायला लागतो, तेव्हा आत असलेले सूक्ष्मजीव आपलं जीवनकार्य पुन्हा सुरू करतात.  
बर्फ वितळत असल्याने सैबेरिया परिसरात अत्यंत प्राचीन अशा सजीवांचे अवशेषही मोठ्या प्रमाणात मिळताहेत. आता नामशेष झालेल्या पण ५० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जीवाश्मांमधून विषाणू बाहेर काढण्याच्या प्रयत्नात रशिया आहे. हे जीवाश्म हजारो वर्षांपूर्वी बर्फाखाली दाबले गेले होते. रशियाचे संशोधक या परिसरातून प्राचीन हत्ती आणि गेंडे, त्याचप्रमाणे प्रागैतिहासिक काळातील कुत्रे, घोडे, उंदीर, ससे इत्यादी प्राण्यांचे अवशेष शोधून काढत आहेत. रशियामधील जैविक शस्त्रे बनविण्याच्या संशोधन केंद्रातील वैज्ञानिक तेथील जैविक सामग्री बाहेर काढत आहेत. 
‘डेली मेल’ या वृत्तमाध्यमाच्या माहितीनुसार, सगळ्यांत प्राचीन जीवाश्म पन्नास हजार वर्षांपेक्षाही अधिक प्राचीन आहे. तो एका उंदरासारखा आहे. ‘व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी ॲण्ड बायोटेक्नॉलॉजी’ या संशोधन केंद्रात याबाबत अधिक संशोधन केले जात आहे. शीतयुद्धाच्या दरम्यान सोव्हिएत संघाचे तत्कालीन नेता लिओनिड ब्रेझनेव यांनी या केंद्राची स्थापना केली होती. त्या वेळी जैविक शस्त्रे तयार करण्यासाठी संशोधन करणे हा या केंद्राचा उद्देश होता. याच केंद्रातर्फे कोरोनावरील नवीन लसही बनविली जात आहे. रशियात सध्या अस्तित्वात असलेल्या ‘स्पुतनिक व्ही’ या लसीला ती मोठी टक्कर असेल, असं मानलं जातं. 
जगातील सर्वांत थंड शहर याकुत्स्क येथील एका प्रसिद्ध म्युझियममधून रशियन शास्त्रज्ञांनी पुरातन जीवाश्मांपासून ५० नमुने गोळा केले आहेत. 

माणूस आणखी दीर्घायुषी होणार? 
या संशोधनामुळे पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वावर नवा प्रकाश पडणार आहे. हे सजीव इतक्या कठीण परिस्थितीतही कसे जगू शकतात, सुप्तावस्थेत ते कसे जातात, आपली चयापचय क्रिया जवळपास हजारो वर्षं ते सुप्तावस्थेत कशी ठेवू शकतात आणि ते परत ‘जीवंत’ कसे होऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा यामुळे होऊ शकणार आहे. मानवाचं आयुष्य आणखी कसं वाढवता येऊ शकेल, याचाही अभ्यास या संशोधनातून होणार आहे.

Web Title: Around the world: After 24,000 years of sleep, 'he' a awake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.