जगभर : ढगांना इलेक्ट्रिक शॉक देऊन दुबईत पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:06 AM2021-08-17T08:06:02+5:302021-08-17T08:06:26+5:30
Around the world: संयुक्त अरब अमिरात हा देश जगभरातील सर्वाधिक दहा उष्ण देशांमध्ये गणला जातो. यंदाही दुबईनं अनेकदा पन्नास अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला.
अनेक कारणं आहेत; पण त्यामुळे पृथ्वीचं तापमान झपाट्यानं वाढतं आहे. एकीकडे उष्णतेनं लोक परेशान झाले आहेत, तर दुसरीकडे हवामानबदलामुळे काही ठिकाणी प्रचंड पाऊस तर काही ठिकाणी थेंबभरही पाऊस नाही, अशीही स्थिती अनुभवायला येते आहे. संयुक्त अरब अमिरातीसारखा देश तर कायमच सूर्याच्या उष्णतेनं होरपळलेला असतो. तिथे पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे. वर्षभरात केवळ तीन ते चार इंच पाऊस पडतो. त्यामुळे पावसासाठी इथले लोक कायमच आसुसलेले आणि तहानलेले असतात. जिथून कुठून पाणी मिळेल, ते मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात.
संयुक्त अरब अमिरात हा देश जगभरातील सर्वाधिक दहा उष्ण देशांमध्ये गणला जातो. यंदाही दुबईनं अनेकदा पन्नास अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला. देशाचा हा ‘इतिहास’ बदलण्यासाठी आणि पावसाचं प्रमाण वाढवण्यासाठी तिथले संशोधकच आता पुढे आले आहेत. कृत्रिम पावसासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग तिथे केला जातो आहे. त्याचं प्रत्यंतर नुकतंच आलं. दुबईच्या हमरस्त्यांवर टपोऱ्या थेंबांचा पाऊस कोसळत असल्याचं अभूतपूर्व दृश्य तिथे नुकतंच पाहायला मिळालं. कधी न दिसणारा पाऊस पाहायला मिळाल्यामुळे लोकांनाही जणू हर्षवायू झाला होता; पण असं काय केलं संशाेधकांनी, दुबईत अचानक पाऊस कसा काय कोसळायला लागला?
-संशोधकांनी अभिनव प्रयोग करताना ढगांना इलेक्ट्रिकचा शॉक दिला. संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान खात्यानं त्यासाठी पुढाकार घेतला.
ढगांना इलेक्ट्रिकचा शॉक दिल्यामुळे ढग एका ठिकाणी एकत्र येतात. इतस्तत: पसरलेले पाण्याचे रेणू जवळ येतात. एकमेकांत मिसळतात. हे थेंब जड आणि मोठे झाल्यामुळे मग पाऊस पडू लागतो. यावेळी संयुक्त अरब अमिरातीच्या संशोधकांनी ज्या भागात पाऊस हवा आहे, तेथील ढगांना ड्रोनच्या सहाय्याने इलेक्ट्रिकचा शॉक दिला आणि वाळवंटात पाऊस पडू लागला. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ‘कोरड्या’ पाण्याचे जे छोटे छोटे रेणू इतस्तत: फिरत असतात, ते बऱ्याचदा बाष्पीभवन होऊन नाश पावतात. या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही, पण नवीन तंत्रज्ञानामुळे हे छोटे रेणुदेखील एकत्र करून त्यांना पावसाच्या रूपात धरतीवर आणता येतं. खरं तर हादेखील क्लाउड सिडिंगचाच एक प्रकार आहे. क्लाऊड सिडिंगमध्ये ढगांवर मीठ आणि रसायनांचा मारा केला जातो. पण रसायनांवर भरोसा न ठेवता, संयुक्त अरब अमिरातीनं यावेळी ढगांना शॉकच दिला!
क्लाउड सिडिंग हा प्रकार ‘आधुनिक’ मानला जात असला तरी तसा तो बऱ्यापैकी जुना आहे आणि अनेक देशांनी पाऊस पाडण्यासाठी हा प्रयोग केला आहे. भारताचाही त्यात समावेश आहे.
पाऊस पाडण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीनं यावर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे १५० उड्डाणं केली आणि वेगवेगळ्या भागात पाऊस पाडला.
या प्रयोगावर मुख्य काम इंग्लंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग’च्या संशोधनकांनी केलं आहे. या संशोधनातील एक प्रमुख शास्त्रज्ञ प्रो. गाइल्स हॅरिसन म्हणतात, ढगांतील छोट्यातल्या छोट्या पाण्याच्या थेंबाचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही हा प्रयोग विकसित केला. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाची खरोखरच नितांत गरज आहे, अशा ठिकाणीही पाऊस पाडण्यासाठी या प्रयोगाचा उपयोग झाला आणि होऊ शकतो.
संयुक्त अरब अमिरातीनं २०१७ मध्येही या प्रयोगावर तब्बल १५ मिलिअन डॉलर्स खर्च केले होते. हे तंत्रज्ञान तसं बरंच महागडं आहे. एक वर्ग फूट पाऊस पाडण्यासाठी साधारणपणे २०२ डॉलर्स (१५ हजार रुपये) खर्च येतो. या प्रयोगाचा खर्च जास्त असला तरी या प्रयोगाच्या यशस्वीतेचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, असं मानलं जातं. संयुक्त अरब अमिरातीने यंदा केलेल्या या प्रयोगाचा व्हिडिओही त्यांच्या हवामान खात्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. दुष्काळी प्रदेशाच्या भविष्यासाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण मानला जात असला तरी या प्रयोगावर अनेक संशोधक आणि पर्यावरणवाद्यांनी टीकाही केली आहे. दुसऱ्या प्रदेशातील ढग पळवण्याचा प्रकार तर यामुळे होऊ शकतोच, शिवाय ढगांवर रसायनं आणि मिठाचा मारा केल्यानं पर्यावरणालाही त्यामुळे मोठी हानी पोहोचू शकते असा त्यांचा दावा आहे. दुसऱ्या भागातील ढग पळवण्याच्या प्रकारामुळे एका नव्याच संघर्षाला तोंड फुटू शकतं आणि ते जास्त हानिकारक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
पन्नास देशांत कृत्रिम पावसाचा प्रयोग!
या प्रयोगासाठी संयुक्त अरब अमिरातीत पुरेशा प्रमाणात ढग आहेत असं संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थात या प्रयोगाची सफलताही शंभर टक्के नाही. कारण ढगांना शॉक दिला म्हणजे प्रत्येकवेळी त्यातून पाऊस पडेलच असं नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही प्रणाली अमेरिकेनं सर्वात पहिल्यांदा १९४५ मध्ये विकसित केली. त्यानंतर अनेक देशांत याचे वेळोवेळी प्रयोग झाले. सध्या पन्नासपेक्षा अधिक देश या प्रयोगाद्वारे ‘दुष्काळात पाऊस’ पाडत आहेत!..