ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:36 PM2023-03-21T14:36:09+5:302023-03-21T14:36:54+5:30
व्लादिमीर पुतिन हे रशियासारख्या ताकदवान देशाचे राष्ट्रपती आणि जगातील टॉप पॉवरफूल नेत्यांपैकी एक आहेत
नवी दिल्ली - १७ मार्च २०२३ रोजी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजे ICC नं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात वॉर क्राईम आरोपात अरेस्ट वॉरंट काढले आहे. ICC नं पुतिन यांना वॉर क्राईमसाठी आरोपी बनवले. यूक्रेनमधील लहान मुलांना बेकायदेशीरपणे रशिया घेऊन जाण्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यूक्रेनच्या मुलांचे अपहरण करून त्यांना रशियाला घेऊन जात असल्याची माहित पुतिन यांना होती. मुलांच्या अपहरणाचे प्रकरण थेट पुतिन यांच्याशी जोडले आहे. पुतिन यांना माहिती असतानाही त्यांनी त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांना आणि इतरांना हे करण्यास रोखले नाही असा ठपका त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठेवला आहे.
ICC अरेस्ट वॉरंटनंतर पुतिन यांना अटक होणार?
व्लादिमीर पुतिन हे रशियासारख्या ताकदवान देशाचे राष्ट्रपती आणि जगातील टॉप पॉवरफूल नेत्यांपैकी एक आहेत. अशावेळी रशियात त्यांना अटक करणे शक्य नाही हे निश्चित आहे. परंतु पुतिन रशियाच्या बाहेर पडून दुसऱ्या देशात गेले तर त्यांना अटक करण्यात येऊ शकते. परंतु सध्या पुतिन यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यामुळे ते रशियासोडून बाहेरच्या देशात जाण्याची शक्यता कमी आहे.
पुतिन यांना भारतात अटक होऊ शकते?
ICC अरेस्ट वॉरंट जारी झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन भारतात आल्यावर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकत नाही. त्यामागे २ कारणे आहेत. भारत हा ICC सदस्य देशांमध्ये सहभागी नाही. १९९८ मध्ये भारताने रोम करारावर स्वाक्षरी केली नाही. अशावेशी ICC ने वॉरंट जारी केला आहे. ते भारतासाठी बंधनकारक नाही. जर भारत ICC चा सदस्य असता तरीही तो आदेश मान्य करण्याचं बंधन नसते. याचे कारण म्हणजे ICC चं वॉरंट त्यांच्या सदस्य देशांसाठी एक सल्ला म्हणून असते.
२०१५ मध्ये अशीच एक संधी होती जेव्हा सूडानचे राष्ट्रपती उमर हसन अहमद अल बशीर भारताच्या दौऱ्यावर आले. ते भारतात होणाऱ्या इंडिया-आफ्रिका समिटमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यावेळी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने उमर हसन यांना अटक करून त्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. २००९ मध्ये आयसीसीने बशीर यांच्याविरोधात सूडानमध्ये वॉर क्राईम आरोपाखाली अरेस्ट वॉरंट जारी केले होते.
ICC पुतिन यांना कधीच अटक करू शकत नाही?
इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाकडे राष्ट्रपती पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार नाही. मात्र, अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पुतिन आयसीसी सदस्य देशांच्या दौऱ्यावर गेल्यास त्यांना ताब्यात घेऊन खटला सुरू केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पुतिन यांच्याकडून अशी चूक होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत त्यांना ताब्यात घेऊन खटला चालविल्याशिवाय त्याच्या अटकेची शक्यता नाही.