...म्हणून सुंदर बायकांना संपवतो हा किलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:42 AM2022-02-25T08:42:44+5:302022-02-25T08:44:06+5:30

ॲण्ड्रेसला पकडल्यानंतर त्याच्या शेजारच्यांनी सांगितलं, ॲण्ड्रेस कायम ‘प्यालेला’ असायचा आणि....

article on Alleged cannibal serial killer Andres Mendoza El Feminicida de Atizapán arrested in Atizapan Mexico City | ...म्हणून सुंदर बायकांना संपवतो हा किलर!

...म्हणून सुंदर बायकांना संपवतो हा किलर!

googlenewsNext

दारू आणि वखवखलेली नजर!... ॲण्ड्रेसला पकडल्यानंतर त्याच्या शेजारच्यांनी सांगितलं, ॲण्ड्रेस कायम ‘प्यालेला’ असायचा आणि महिलांकडे पाहण्याची त्याची दृष्टीही विकृत होती. या वयातही महिलांकडे, त्यातही सुंदर आणि तरुण महिलांकडे तो वखवखलेल्या नजरेनं पाहायचा. काहींच्या दृष्टीनं मात्र तो अतिशय शांत आणि निरूपद्रवी माणूस होता!

रामन राघव  आठवतो? सत्तरच्या दशकात अख्खी मुंबई त्यानं एकट्यानं हादरवून सोडली होती. संपूर्ण मुंबईत त्याची दहशत होती. सलगपणे होणाऱ्या हत्यांमुळं १९६८ मध्ये मुंबई हादरली होती. एकापाठोपाठ खून होत होते आणि हे खून कोणी, केव्हा, कसे केले, काहीच कळत नव्हतं. शिवाय यातले बरेचसे खून सर्वसामान्य लोकांचे झाले होते. या खूनसत्रामुळं मुंबईतील सर्वसामान्य नागरिक खूप घाबरलेले असायचे. बाहेर पडताना लोक स्वत:सोबत संरक्षणासाठी काठ्या घेऊन निघायचे. रामन राघव एक ‘सायको’ सिरियल किलर होता. जवळपास पन्नास खून त्यानं केले, तरीही तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी मुंबईचं अख्खं पोलीस दल डोळ्यांत तेल घालून पहारा देत होतं. पण, राघव काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता, मुळात हे खून कोण, कशासाठी करतंय, याचाच पत्ता लागत नसल्यानं पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते.

ॲलेक्स फियालोह या चाणाक्ष पोलीस अधिकऱ्यानं अतिशय चतुराईनं रामन राघवला पकडलं होतं. मुंबईत पाऊस नसतानाही रामन राघव ओली छत्री घेऊन फिरत होता... केवळ या एका गोष्टीनं ॲलेक्स यांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी रामन राघवला अलगद जाळ्यांत पकडलं. न्यायालयानं रामन राघवला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण, १९९५ मध्ये रामन राघवचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी याच सत्य घटनेवर आधारित ‘रामन राघव २.०’ हा चित्रपट तयार केला होता. नवाजुद्दीन सिद्दिकीनं यात किलर रामन राघवची भूमिका साकारली होती. सिरियल किलरवर बॉलिवूडमध्ये याआधीही अनेक चित्रपट येऊन गेले आहेत.

आता पुन्हा या सिरियल किलर्सकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे मेक्सिकोमधील अशाच एका सायको, माथेफिरु सिरियल किलरला पोलिसांनी पकडलं आहे. ॲण्ड्रेस मेंडोसा हे त्याचं नाव. एक नाही, दोन नाही, तीन नाही, त्यानंही एकामागोमाग तीस खून केले आहेत. वर्षामागून वर्षे तो अनेकांचे खून करत होता. पण पोलिसांच्या तावडीत  सापडत नव्हता. पोलीसही त्याच्या मोडस ऑपरेंडीनं चक्रावले होते. पण, अखेरीस पोलिसांच्या सापळ्यात तो अडकलाच. ॲण्ड्रेस मेंडोसा आज ७२ वर्षे वयाचा आहे आणि व्यवसायानं खाटीक! 

एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचाही त्यानं नुकताच खून केला होता. खुनाच्या आरोपांखाली अटक झाल्यानंतर नुकतंच त्याला न्यायालयात उभं करण्यात आलं. मी ‘फक्त’ पाच खून केल्याची कबुली त्यानं दिली’. न्यायालयानं त्याला विचारलं, पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोचा खून आत्ता तू कशासाठी केलास? तिनं तुझं काय वाकडं केलं होतं? - यावर ॲण्ड्रेसनं काय उत्तर द्यावं?... - तो म्हणाला, ‘कारण या पोलीस अधिकाऱ्याची बायको दिसायला फारच सुंदर होती ! म्हणून मी तिचा खून केला आणि तिच्या चेहऱ्यावरची कातडीही ओरबाडून काढली. इतक्या सुंदर बायका मला पसंत नाहीत!’... न्यायालयही त्याच्या या उत्तरानं हादरलं. 

ॲण्ड्रेस मेंडोसानं २००१ ते २०२१ या काळात अनेक खून केले, त्यातले बरेचसे खून आता तो नाकारत असला, तरी तो म्हणतो, जे खून मी केले, त्याबद्दल मला काहीही पश्चाताप होत नाही. जे केलं, ते केलं... ते मला करायचंच होतं.

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खुनानंतर पोलिसांना त्याच्याविषयी शंका आल्यानं ते त्याच्या घरापर्यंत पोहोचले. पोलीस आल्याचं पाहून बराच वेळ त्यानं दरवाजा उघडलाच नाही. पण पोलिसांनी जोरजबरदस्ती आणि आपला इंगा दाखवून दार उघडलं, त्यावेळी त्यांनाही फिट यायची तेवढी बाकी राहिली. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृतदेह त्यानं आपल्या घरात दडवून ठेवलेला होता. इतकंच नाही, आपल्या घरात त्यानं एक तळघर बनवलेलं होतं. त्यातही छिन्नविछिन्न झालेले अनेक मृतदेह होते. याशिवाय पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडला, तो म्हणजे एक डायरी! या डायरीत अनेक स्त्री-पुरुषांची नावं लिहिलेली होती. यातील काही जणांना त्यानं ‘अंजाम तक’ पाठवलेलं होतं, बाकीच्या काहींना ‘वर’ पाठवण्याची तयारी केलेली होती. ॲण्ड्रेस मेंडोसा जर सापडला नसता, तर यादीतल्या अनेकांचा नंबर येत्या काळात लागू शकला असता आणि ते ‘देवाला प्रिय’ झाले असते! ॲण्ड्रेसनं त्याच्या घरात इतक्या गुप्तपणे या मृतदेहांची विल्हेवाट लावली होती की, सारे पुरावे सापडवण्यात आणि गोळा करण्यात त्यांना तब्बल एक महिना लागला.

Web Title: article on Alleged cannibal serial killer Andres Mendoza El Feminicida de Atizapán arrested in Atizapan Mexico City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.