विजेसाठी उभारणार कृत्रिम बेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:49 AM2017-03-17T00:49:03+5:302017-03-17T00:49:03+5:30
ब्रिटनच्या किनाऱ्याजवळ मानवनिर्मित बेट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बेट युरोपच्या काही भागांत अक्षय ऊर्जेचा पुरवठा करण्यास सक्षम असेल
लंडन : ब्रिटनच्या किनाऱ्याजवळ मानवनिर्मित बेट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बेट युरोपच्या काही भागांत अक्षय ऊर्जेचा पुरवठा करण्यास सक्षम असेल. पवनचक्की आणि सौर पॅनलचे जाळे असलेले हे बेट ब्रिटन, डेन्मार्क, जर्मनी, द नेदरलॅण्ड नॉर्वे आणि बेल्जियम या सहा देशांचे ऊर्जा केंद्र म्हणून काम करील. द नेदरलॅण्ड, डेन्मार्क आणि जर्मनीतील विद्युत कंपन्यांच्या महासंघाने सुचविलेल्या या १.१ अब्ज पौंडाच्या प्रकल्पाला युरोपियन युनियन प्रमुखांनी यापूर्वीच पाठिंबा दिला असून, ब्रुसेल्स २३ मार्च रोजी त्यावर शिक्कामोर्तब करील, अशी अपेक्षा आहे.
२५ चौरस कि.मी.च्या या बेटावर कर्मचाऱ्यांसाठी रस्ते, कार्यशाळा, झाडे आणि कृत्रिम सरोवर असेल. याशिवाय ७००० किंवा त्याहून अधिक पवनचक्क्यांसह एक विमानतळ, बंदर, नियंत्रण कक्ष आणि टर्मिनलचीही सोय असेल. २०५० पर्यंत या केंद्राची उभारणी पूर्ण होईल, अशी आशा असल्याचे एनर्जीनेट या डेन्मार्कच्या सरकारी वीज कंपनीने सांगितले. काहींना हा प्रकल्प वेडेपणा किंवा विज्ञान कथेसारखा कल्पनारम्य वाटेल; परंतु डॉगर किनाऱ्यावरील हे बेट भविष्यात सर्वात किफायतशीर पवनऊर्जेची निर्मिती करील, असे एनर्जीनेटचे तांत्रिक संचालक टॉर्बेन ग्लार नाईलसेन यांनी म्हटले. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हे केंद्र ८० दशलक्ष लोकांची विजेची गरज भागवील.