भूतानशी सीमावादामागे चीनचे लक्ष्य अरुणाचल प्रदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:28 AM2020-07-07T04:28:01+5:302020-07-07T04:29:06+5:30
पूर्व भागात हा दावा करण्यामागे चीनची योजनाबद्ध पावले असून, भारतावर भूतानच्या माध्यमातून हा त्याचा नवा राजनैतिक हल्ला आहे.
बीजिंग : भारताला लक्ष्य करण्यासाठी भारताचा मित्र भूतानशी आमचा सीमावाद आहे, असे चीन सरकारने प्रथमच जाहीरपणे सांगितले आहे. पूर्व भागात हा दावा करण्यामागे चीनची योजनाबद्ध पावले असून, भारतावर भूतानच्या माध्यमातून हा त्याचा नवा राजनैतिक हल्ला आहे.
भूतानच्या पूर्वेकडील भाग हा अरुणाचल प्रदेशला लागून असल्यामुळे त्याने हा दावा केला असू शकतो. अरुणाचल प्रदेश हा पूर्णपणे आमचा म्हणजे ‘दक्षिण तिबेट’चा भाग असल्याचा त्याचा दावा आहे. भूतानशी सीमावाद असल्याचे त्याने प्रथमच बोलण्यामागील हेतू हा असू शकतो. जून महिन्यात झालेल्या अनेकस्तरीय पर्यावरण व्यासपीठावर पहिल्यांदा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, पूर्व भागात आमचा भूतानशी सीमावाद आहे. यावेळी भारतही उपस्थित होता.
पूर्व भागातील घडामोडींवर लक्ष असलेल्या अनेकांना या दाव्याचे आश्चर्य वाटले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, चीन-भूतान सीमा कधीही निश्चित करण्यात आलेली नाही आणि पूर्व, मध्य आणि पश्चिम विभागांत
प्रदीर्घ काळपासून वाद आहेच. चीन-भूतान सीमा वादात तिसऱ्या देशाने लक्ष घालू नये, असेही त्यात म्हटले होते. हा तिसरा देश म्हणजे भारत असल्याचे त्यात अप्रत्यक्षपणे म्हटले होते.
सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा कायम
सकतेंग वन्यजीव अभयारण्यावर चीनने दावा सांगितल्यानंतर काळजीत पडलेल्या भूतानने चीनला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हे अभयारण्य भूतानचा अविभाज्य भाग आहे.
चीन आणि भूतानचे एकमेकांच्या देशात दूतावास नाहीत. नवी दिल्लीतील आपल्या दूतावासातून ते राजनैतिक संपर्क ठेवतात. अर्थात, चीनने स्पष्ट केले आहे की, हा वाद खूप जुना आहे.
पश्चिम आणि मध्य भागातील या विषयावर चीनशी चर्चा करण्यासाठी भूतान तयार आहे. चीनने सकतेंग वन्यजीव अभयारण्याची ६५० चौरस कि.मी. जागा आपली असल्याचा दावा केला आहे.
चीन देणार पाकिस्तानला चार ड्रोन
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीन आता पाकिस्तानला चार ड्रोन देण्याच्या तयारीत आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि ग्वादरमध्ये तयार होत असलेल्या चिनी नौदलाच्या तळाचे संरक्षण करण्यासाठी चीन हे पाऊल उचलत आहे.
ग्वादर हे ठिकाण बलुचिस्तानच्या दक्षिण पश्चिम भागात आहे. चीन येथे आपले नौदलाचे तळ उभारत आहे. पाकिस्तानमध्ये कॉरिडॉरसह अन्य प्रकल्पांत चीन जवळपास ४.४८ लाख कोटी रुपये गुंतवणूक करीत आहे.
चीन आणि पाकिस्तान मिळून ४८ जीजे-२ ड्रोन बनवीत आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलासाठी चीनमध्ये याचे डिझाइन केले जात आहे. जीजे-२ हे ड्रोन विंग लूंग २ चे अत्याधुनिक मॉडल आहे. चीनने यापूर्वी आशियातील काही देशांना विंग लूंग २ ड्रोन विक्री केले होते. २००८ ते २०१८ या काळात चीनने कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अल्जिरिया, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातसह एक डझन देशांना १६३ ड्रोन वितरित केले आहेत.
हे ड्रोन टेहळणी तर करतातच; पण गोपनीय माहिती एकत्र करतात आणि लक्ष्यावर हल्ला करतात. अशा प्रकारच्या ड्रोनसाठी भारत अमेरिकेशी सतत संपर्क करीत आहे. या ड्रोनचा उपयोग सध्या लिबियात तुर्की समर्थित सरकारविरुद्ध यशस्वीपणे केला जात आहे.