विमानात गैरवर्तनाच्या तब्बल ४२४२ तक्रारी, विभागणी दोन श्रेणींत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:17 AM2023-01-19T07:17:19+5:302023-01-19T07:17:54+5:30
गतवर्षीचा लेखाजोखा, जगभरातील विमान कंपन्यांना डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विमानात सह-प्रवाशावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उजेडात आला असला तरी गेल्या वर्षात प्रवासी गैरवर्तनाच्या तब्बल ४२४२ तक्रारी विमान कंपन्यांना प्राप्त झाल्याचे वृत्त आहे.
‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ (आयएटीए) या प्रमुख संघटनेने आता अशा प्रकारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, यानुसार गेल्या तीन वर्षांत विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करण्याच्या प्रवाशांच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. कोरोनानंतर २०२१ मध्ये ५६७२ प्रवासी गैरवर्तनाच्या घटनांची नोंद झाली आहे. तर, २०२२ या वर्षामध्ये ४२४२ घटनांची नोंद झाली आहे. २०२० या वर्षामध्ये कोरोनामुळे विमान प्रवास थंडावला असला तरी तुरळक विमान प्रवासामध्ये २६८८ घटनांची नोंद झाली.
गैरवर्तनाची विभागणी दोन श्रेणींत
लेव्हल-१
हा प्रकार तुलनेने किरकोळ गैरवर्तनाचा समजला जातो. यात प्रामुख्याने कोरोना काळात विमान कंपन्यांनी राबविलेल्या सुरक्षा नियमाच्या उल्लंघनाच्या घटना आहेत. मध्येच मास्क काढून टाकणे वा वारंवार मास्क न घालणे आदी घटनांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, टेकऑफ, लँडिंग किंवा टर्ब्युलन्स दरम्यान सेफ्टी बेल्ट न लावणे याही घटनांचा यात समावेश आहे.
लेव्हल-२
हा प्रकार गंभीर समजला जातो. यामध्ये विमान प्रवासात गोंधळ घालणे, आक्रमक होणे, वाद-भांडणे करणे अशा बाबींचा समावेश आहे.