पीपीपी नेत्या टाळ्या वाजवत होत्या अन् अचानक चेहऱ्यावर धडकले ड्रोन, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:58 AM2022-03-05T11:58:37+5:302022-03-05T13:05:01+5:30
एका कार्यक्रमावेळी मीडिया चॅनलचे ड्रोन त्यांना धडकले. या घटनेमुळे त्या जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खानेवालमध्ये इम्रान सरकारविरोधात प्रचार करणाऱ्या पीपीपी (PPP) नेत्या आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कन्या असिफा भुट्टो यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमावेळी मीडिया चॅनलचे ड्रोन त्यांना धडकले. या घटनेमुळे त्या जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीपीपी नेत्यांकडून शुक्रवारी पाकिस्तानमधील खानवाल भागात आंदोलन करण्यात आले. सध्याच्या इम्रान सरकारच्या विरोधात पीपीपी नेते एकत्र आले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मोठा जनसमुदायही यावेळी उपस्थित होता. पण एका मीडिया चॅनलचा ड्रोन अचानक पीपीपी नेत्या असिफा भुट्टो यांच्यावर धडकला आणि त्या जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याबाबत बिलावल भुट्टो म्हणाले की, हा फक्त अपघात आहे की कोणाचे तरी कट कारस्थान आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, बिलावल भुट्टो यांच्या सुरक्षा कर्मचार्यांनी ड्रोन ऑपरेटरला पकडले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारचे प्रवक्ते हंसन खवर यांनी सांगितले की, डॉ. बाबर यांना घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. ते स्वत: कंटेनरमध्ये गेले आणि त्यांनी असिफा यांच्यावर उपचार केले. असिफा यांच्या डोळ्यावर खरसटले असून हातावर जखमा झाल्या आहेत. आधी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले होते, मात्र आसिफा यांनी पट्टी बांधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
(पाकिस्तानी चॅनल डॉनने हा व्हिडिओ शेअर केला आहे)
दरम्यान, त्यांचा पट्टी बांधलेला एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, पाकिस्तान सरकारचे अनेक मंत्री आणि इतर नेते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असिफा यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहेत. याशिवाय, या आंदोलनाबाबत बोलायचे झाले तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात 27 फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. 8 मार्चला इस्लामाबादला पोहोचण्याची तयारी सुरू आहे. एकूण 34 जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर हा पीपीपी मोर्चा येथे पोहोचणार आहे.