अशोक गाडगीळ यांचा ‘व्हाइट हाउस राष्ट्रीय पदक’ने सन्मान; जो बायडेन यांच्या हस्ते गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:48 AM2023-10-26T05:48:26+5:302023-10-26T05:50:39+5:30
सुब्रा सुरेश यांनाही पुरस्कार प्रदान.
वॉशिंग्टन : जलशुद्धीकरणासाठी तंत्रज्ञान निर्मितीसह ऊर्जा-कार्यक्षम स्टोव्ह, कार्यक्षम इलेक्ट्रिक लाइट निर्मिती करण्याबरोबर जीवनावश्यक संसाधने उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय-अमेरिकी शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ आणि डॉ. सुब्रा सुरेश यांच्यासह १२ जणांना प्रतिष्ठित ‘व्हाइट हाऊस राष्ट्रीय पदक’ प्रदान केले. गाडगीळ हे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.
आर्सेनिकमुक्त पाणीपुरवठा
मी माझे विज्ञान, अभियांत्रिकी आणि सर्जनशीलतेचे ज्ञान वापरून थोडासा आधार शोधणाऱ्या गरजवंतांवरील अन्याय कमी करण्याचा प्रयत्न करतो. भूगर्भातील पाण्यातील आर्सेनिक पाण्याचा अपव्यय न करता काढण्यावर आम्ही संशोधन करत आहे. आता भारतात दोन सामुदायिक प्रकल्प कार्यरत आहेत. त्यातून अवघ्या ०.०४ रुपये प्रतिलिटर दराने सुरक्षित पिण्याचे पाणी विकले जात आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.
सुब्रा सुरेश कोण आहेत?
राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशनचे माजी प्रमुख सुब्रा सुरेश हे ब्राऊन अभियांत्रिकी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अभियांत्रिकी, भौतिक विज्ञान आणि जीवन विज्ञानातील अग्रगण्य संशोधनासाठी पुरस्कार देण्यात आला.