आशियाच्या बाजारात कच्चे तेल आणखी स्वस्त
By admin | Published: August 17, 2015 11:19 PM2015-08-17T23:19:05+5:302015-08-17T23:19:05+5:30
मागणी सुस्तावल्यानंतरही कच्च्या तेलाचा बाजारातील पुरवठा कमी होण्याची चिन्हे नसल्यामुळे सोमवारी आशियाच्या बाजारात तेलाचे भाव घसरण्याचा कल कायम राहिला
सिंगापूर : मागणी सुस्तावल्यानंतरही कच्च्या तेलाचा बाजारातील पुरवठा कमी होण्याची चिन्हे नसल्यामुळे सोमवारी आशियाच्या बाजारात तेलाचे भाव घसरण्याचा कल कायम राहिला. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या तेलाचा भाव बॅरलमागे ६३ सेंटस्ने खाली येऊन ४१.८७ अमेरिकन डॉलर झाला.
मार्च २००९ नंतरची ही सगळ्यात कमी किंमत आहे. बें्रटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे कच्चे तेल बॅरलमागे ६५ सेंटस्ने स्वस्त होऊन ४८.५४ अमेरिकन डॉलरवर आले.
अमेरिकेत तेल विहिरीतून गेल्या आठवड्यात तेल उपसा वाढल्याचे दडपण आशियाच्या बाजारावर आले, असे विश्लेषकांनी सांगितले. किमती खाली आल्यानंतरही तेल निर्यातदार राष्ट्रांच्या संघटनेने व अमेरिकेने तेल पुरवठा थांबविलेला नाही. चीनचे चलन युआनचे गेल्या आठवड्यात तीन वेळा अवमूल्यन झाल्यानंतर अमेरिकन डॉलर वधारला.