पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 08:29 PM2017-10-17T20:29:01+5:302017-10-17T20:29:09+5:30
पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून, त्यात त्यांचा मृत्यू झालाय.
वलेत्ता - पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून, त्यात त्यांचा मृत्यू झालाय. दक्षिण युरोपातील माल्टा देशात स्थायिक झालेल्या डॅफनी आपल्या घरातून उत्तर माल्टाच्या दिशेनं कारमधून जात होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडाडीच्या पत्रकार डॅफनी यांच्या मृत्यूनंतर माल्टातील तीन हजार नागरिक रस्त्यावर उतरले असून, हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी कँडल मार्चसुद्धा काढलाय. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी डॅफनी यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. पत्रकारांची हत्या करणं म्हणजे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आघात आहे. पत्रकार म्हणून त्या माझ्या विरोधक होत्या. परंतु त्यांच्या हत्येचा निषेधच करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
डॅफनी या स्वतंत्र ब्लॉग लिहित होत्या. ब्लॉगमधून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली. त्यामुळे त्यांची लेडी विकिलिक्स नावानं देखील ओळख आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक ब्लॉग प्रसिद्ध केला होता. त्या ब्लॉगमध्येसुद्धा त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. ब्लॉगमध्ये त्यांनी ‘इथे लबाड लोक राहत असून, परिस्थिती भयंकर आहे,’ असंही म्हटलंय.
डॅफनी यांनी 2016मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. या गौप्यस्फोटांमध्ये आइसलँड, युक्रेनचे राष्ट्रपती, साऊदी अरेबियाचे शाह आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश होता. तसेच रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन, अभिनेता जॅकी चेन आणि फुटबॉलपटू लायनल मेसी यांच्याही नावाबाबत अनेक खुलासे केले होते.