सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 07:51 PM2023-09-26T19:51:33+5:302023-09-26T19:52:31+5:30
येत्या 5 ऑक्टोबर रोजी NASA अंतराळातील सर्वात श्रीमंत लघुग्रहावर यान पाठवणार आहे.
अंतराळात हजारो लाखो लहान-मोठे ग्रह/लघुग्रह आहेत. यातील एका लघुग्रहावर सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान धातूंचा मोठा साठा आहे. अमेरिकन अंतराळ संस्था NASA या लघुग्रहावर जाणार आहे. या लघुग्रहावर इतक्या मोठ्या प्रमाणात धातू आहे की, जगातील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकतो. या लघुग्रहाचे रहस्य शोधण्यासाठी नासाने मोहिम आखली आहे.
16 सायकी लघुग्रहावर जाणाऱ्या या मोहिमेला नासाने 'सायकी' असे नाव दिले आहे. हे मिशन 5 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:04 वाजता प्रक्षेपित केले जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे नासाचे हे मिशन स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल.
6 वर्षांच्या प्रवासानंतर पोहोचेल
धातूंनी भरलेला हा लघुग्रह पृथ्वीपासून 3.6 अब्ज किलोमीटर दूर आहे. त्यामुळे, नासाच्या यानाला 16 सायकी लघुग्रहावर पोहोचण्यासाठी सुमारे 6 वर्षे प्रवास करावा लागेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान सूर्याभोवती फिरतो. सायकी अंतराळयान पहिली दोन वर्षे पृथ्वीभोवती फिरेल, त्यानंतर ते हळूहळू अनेक टप्पे पार करून 16 सायकेपर्यंत पोहोचेल. हे मिशन अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठा मैलाचा दगड ठरू शकेल.
जगातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होईल
या लघुग्रहावरील धातूंचे मूल्य अंदाजे 700 क्विंटिलियन डॉलर्स(700 नंतर अंदाजे 18 शून्य आहेत.) असल्याचा दावा 16 सायकीचा तपास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ही रक्कम जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटली तर किमान 7 लाख कोटी रुपये त्याच्या खात्यात येतील. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 5 ऑक्टोबर रोजी हे अभियान सुरू केले जात आहे. त्यात खाणकामाची कोणतीही योजना नाही, फक्त त्याच्या गाभ्याचा शोध घेतला जाईल.
1852 मध्ये याचा शोध लागला
16 सायकीचा शोध 1852 मध्ये इटालियन अंतराळवीर अॅनिबेल डीगॅस्पॅरिस यांनी लावला होता. हा लघुग्रह सुमारे 226 किलोमीटर रुंद असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नासाला या लघुग्रहाच्या रचनेची पृथ्वीशी तुलना करायची आहे. ऍरिझोना युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर लिंडी एल्किन्सचा हवाला देत एका अहवालात असे म्हटले आहे की, 16 सायकी सूर्याभोवती 5 वर्षात आपली परिक्रमा पूर्ण करतो. त्याचा एक दिवस साधारण 4 तासांचा असतो.