Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:11 PM2021-07-02T16:11:40+5:302021-07-02T16:12:33+5:30
Corona Vaccine: कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याने त्यावर जगभरात भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
लंडन: केवळ भारतात नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर अद्यापही पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली, तरी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याने त्यावर जगभरात भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ९४ टक्क्यांनी कमी झाला आहे, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. (astrazeneca corona vaccine two doses slashes risk of death 94 percentage in uk)
आताच्या घडीला ब्रिटनमध्ये अॅस्ट्राझेनकाची लस दिली जात आहे. अॅस्ट्राझेनका लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ६५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी झाला आहे. ब्रिटनमधील पब्लिक हेल्थ इंग्लंडने पहिल्यांदा अॅस्ट्राजेनका लसीच्या प्रभावाबाबत अभ्यास केला आहे. कोरोना झालेल्या आणि कोरोनाची लस घेतलेल्यांच्या अभ्यासावर सदर माहिती आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
“वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे
डेल्टा व्हेरिएंटवरील प्रभावाबाबत संशोधन
डेल्टा व्हेरिएंटवरील प्रभावाबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ही लस डेल्टा व्हेरिएंटमुळे गंभीर आजारी होण्यापासून रोखण्यासाठी ९२ टक्के प्रभावी आहे. यामुळे डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तर, फायजरच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यास डेल्टा व्हेरिएंटमुळे गंभीर आजारी झाल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे.
“कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”
मे महिन्यापासून फायझर आणि मॉडर्नाचा वापर
पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, वय ४० वर्षाखालील व्यक्तींना फायझरच्या लसीचा एक डोस ६१ टक्के प्रभावी आहे. तर, मॉडर्नाचा एक डोस ७२ टक्के प्रभावी आहे. ब्रिटनमध्ये ४० वर्षाखालील व्यक्तींना या दोन्ही लसींचा डोस १० मे पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतातही डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. डेल्टा व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आहे का, त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत का, असे सांगता येणार नाही. परंतु, आपण कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम योग्य पद्धतीने पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून बचाव करू शकतो, असे दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.