११ देशांकडून ‘ॲस्ट्राझेनेका’च्या काेराेना लसीचा वापर स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:03 AM2021-03-13T06:03:11+5:302021-03-13T06:03:39+5:30
लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याने चाैघांचा मृत्यू; ‘डब्ल्यू एचओ’कडून तपास सुरू
‘डब्ल्यू एचओ’कडून तपास
जागतिक आराेग्य संघटनेची (डब्ल्यू एचओ) लस सल्लागार समिती या प्रकरणाचा अभ्यास करीत आहे. आतापर्यंत लस आणि रक्ताच्या गुठळ्या निर्माण हाेण्यामध्ये थेट संबंध उघड झालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विविध कंपन्यांच्या लसींचे एकूण २६.८ काेटी डाेस आतापर्यंत देण्यात आले असून लसींच्या दुष्परिणामांमुळे काेणाचाही मृत्यू झाल्याचे उघड झालेले नाही, असे संघटनेने म्हटले आहे.
लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा ‘ॲस्ट्राझेनेका’ने केला असून, मानवी चाचण्यांदरम्यान सखाेल अभ्यास करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तपासासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीने म्हटले आहे.
25 टक्के कपात ‘ॲस्ट्राझेनेका’ने युराेपमध्ये हाेणाऱ्या लसपुरवठ्यात केली आहे. कंपनी युराेपियन देशांना एकूण ४ काेटी डाेस पुरविणार हाेती. मात्र, 3 कोटी डाेस पाठविणार आहे. इटलीतून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणारा साठा युराेपियन कमिशनने राेखल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काेपेनहेगन : लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यानंतर युराेपमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर युराेपमधील १० देशांसह एकूण ११ देशांनी ब्रिटनमधील ‘ॲस्ट्राझेनेका’ कंपनीच्या लसीचा वापर तात्पुरता थांबविला आहे. डेन्मार्कपाठाेपाठ राेमानिया, नाॅर्वे आणि आईसलँड या देशांनी लसीचा वापर थांबविला आहे, तर इटलीने लसीच्या एका बॅचचा वापर स्थगित केला आहे.
‘ॲस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर युरोपातील अनेक देश करत आहेत. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याचा प्रकार लक्षात आला आहे. गुठळ्या निर्माण झाल्याने इटलीमध्ये दाेघांचा मृत्यू झाला, तर नुकताच डेन्मार्कमध्येही एकाचा मृत्यू झाला हाेता.
ऑस्ट्रियामध्ये काही दिवसांपूर्वी एका नर्सचा मृत्यू झाला हाेता. याची दखल घेत ऑस्ट्रियाने तत्काळ लसीच्या एका बॅचचा वापर थांबविला हाेता. त्यानंतर इस्टाेनिया, लॅटीव्हिया, लिथुएनिया, नाॅर्वे, आईसलँड आणि लक्सेमबर्ग या देशांनी ‘ॲस्ट्राझेनेका’च्या लसीचा वापर थांबविला हाेता. थायलंडमध्ये लसीकरण माेहीम सुरू हाेणार हाेती. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून या लसीचा वापर थांबविण्यात आला आहे.
रक्ताच्या गाठी निर्माण हाेण्याचा लसीशी संबंध असल्याचे ठाेस पुरावे नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता वापर थांबविल्याचे डेन्मार्कच्या आराेग्य विभागाचे संचालक साेरेन ब्राेस्टाॅर्म यांनी सांगितले. दाेन आठवड्यांनंतर याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे या लसीचे उत्पादन करण्यात येते.