भारतीय शास्त्रज्ञाचा खगोलीय सिद्धांत ७० वर्षांनी झाला सिद्ध, निरीक्षणाने पुष्टी; ‘रेग्युलस’ ता-याच्या ध्रुवीय प्रकाशाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:31 AM2017-09-20T04:31:13+5:302017-09-20T04:31:16+5:30
प्रचंड वेगाने स्वत:भोवती परिभ्रमण करणा-या ता-यातून ध्रुवीय प्रकाश (पोलर लाइट) उत्सर्जित होतो, हा ‘नोबेल’ पुरस्कार विजेते भारतीय खगोल वैज्ञानिक सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी मांडलेला सिद्धांत आॅस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी आता प्रयोगांती प्रत्यक्ष सिद्ध केला आहे.
मेलबर्न : प्रचंड वेगाने स्वत:भोवती परिभ्रमण करणा-या ता-यातून ध्रुवीय प्रकाश (पोलर लाइट) उत्सर्जित होतो, हा ‘नोबेल’ पुरस्कार विजेते भारतीय खगोल वैज्ञानिक सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी मांडलेला सिद्धांत आॅस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी आता प्रयोगांती प्रत्यक्ष सिद्ध केला आहे.
आॅस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठ व लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजातील संशोधकांनी रात्रीच्या आकाशात अत्यंत प्रखरतेने दिसणाºया ‘रेग्युलस’ या अत्यंत दूरवरच्या ताºयाचे अतिसंवेदनशील साधनांच्या साह्याने निरीक्षण करून, त्या ताºयातून खरोखरच ध्रुवीय प्रकाश उत्सर्जित होत असल्याची नोंद केली. न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे डॉ. डॅनियल कॉटन यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या चमूने केलेल्या या निरीक्षणावर आधारित प्रबंध, ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
‘सिंह’ नक्षत्रपुंजात असलेला ‘रेग्युलस’ हा तारा पृथ्वीपासून ७९ प्रकाशवर्षे दूर आहे. गेल्या महिन्यात दक्षिण अमेरिका खंडात खग्रास सूर्यग्रहणाने भर दुपारी मिट्ट काळोख झाला, तेव्हा सूर्यापासून दोन अंशावर ‘रेग्युलस’ ताºयाचा सर्वात प्रकाशमान ठिपका अभ्यासकांनी पाहिला होता.
डॉ. चंद्रशेखर यांनी ‘ध्रुवीय प्रकाशा’चा गणितीय सिद्धांत सन १९४६ मध्ये मांडल्यापासून, ब्रह्मांडातील अशा प्रकाशाचे निरीक्षण करण्यासाठी ‘स्टेलर पोलरीमीटर’ या वर्गातील उपकरणे आणि साधने विकसित करण्यास सुरुवात झाली होती. डॉ. कॉटन यांच्या वैज्ञानिक तुकडीने ‘हायप्रीसिजन पोलरीमेट्रिक इन्स्ट्रुमेंट’ या आजवरच्या सर्वाधिक प्रगत उपकरणाने हे निरीक्षण केले.
लोह आणि निकेल यासारखी सर्वात जास्त घनतेची मूलद्रव्ये ज्यांच्यापासून दोन तारामंडळांमधल्या पोकळीत विखुरली जातात, अशा आकाशगंगेतील सर्वादिक उष्ण व आकाराने मोठ्या ताºयांचा उत्पत्तीपट उलगडण्यासही या निरीक्षणातून मिळालेली माहिती मोलाची ठरेल, असेही डॉ. कॉटन म्हणाले. (वृत्तसंस्था)
>एका सेकंदात
३२0 किमी वेग
डॉ. कॉटन यांनी लिहिले की, ९६.५ अंशाने आसावर झुकलेला ‘रेग्युलस’ एवढ्या प्रचंड वेगाने स्वत:भोवती फिरताना आम्हाला दिसला की, कलंडून स्थानभ्रष्ट होईल की काय, असे आम्हाला क्षणभर वाटले. त्याच्या परिभ्रमणचा वेग सेकंदाला ३२० किमी एवढा आम्ही मोजला. म्हणजे सिडनी ते कॅनबेरा हे अंतर एक सेकंदाहून कमी वेळात पार करण्यासारखे आहे.