कोणत्याही क्षणी पाकिस्तानी एअरवेज बंद पडणार; पैसे संपले, कंगाल सरकारकडे मोठ्ठे तोंड उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 20:06 IST2023-09-13T20:06:07+5:302023-09-13T20:06:38+5:30
पीआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार जर एअरलाईनला तातडीने पैसे दिले गेले नाहीत तर १५ सप्टेंबरपासून कंपनीच्या विमानांची उड्डाणे रद्द केली जाणार आहेत.

कोणत्याही क्षणी पाकिस्तानी एअरवेज बंद पडणार; पैसे संपले, कंगाल सरकारकडे मोठ्ठे तोंड उघडले
इस्लामाबाद: काही वर्षांपूर्वी सौदी, चीनच्या पैशांवर भलताच हवेत असलेला पाकिस्तान आता पुरता जमिनीवर आला आहे. एवढा की पाकिस्तानची सरकारी एअरलाईन आणखी दोन दिवसांनी उडूही शकणार नाही एवढी खस्ता हालत झाली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवस पुरेल एवढीच गंगाजळी विमान कंपनीकडे उरली आहे.
पीआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार जर एअरलाईनला तातडीने पैसे दिले गेले नाहीत तर १५ सप्टेंबरपासून कंपनीच्या विमानांची उड्डाणे रद्द केली जाणार आहेत. पीआयए आधीच २६ ऐवजी १६ विमानांचे उड्डाण करत आहे. यातील देखील अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. पीआयएच्या पायलट आणि ग्राऊंड स्टाफना गेल्या काही महिन्यांपासून पगारही मिळालेला नाहीय. आतापर्यंत कर्ज घेऊन इंधन आणि स्पेअर पार्टची सोय केली जात होती. ती आता बंद झाली आहे.
बोईंग आणि एअरबस उधारीवर स्पेअर पार्ट देत नाहीएत. आधीचीच उधारी एवढी आहे की ती चुकती केल्याशिवाय पुढे एकही पार्ट दिला जाणार नाहीय. उड्डाणे कमी करावी लागल्याने रोज लाखोंचे नुकसान होत आहे. इंधनाचे पैसे न दिल्याने एका विमानाला दम्मम विमानतळावर आणि चार विमानांना दुबई विमानतळावर रोखण्यात आले होते. पीआयएच्या लेखी आश्वासनानंतर विमानांना सोडण्याची परवानगी देण्यात आली, असे जियो न्यूजला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने $3.5 दशलक्षच्या तात्काळ पेमेंटनंतर PIA ची सेवा पुन्हा सुरु केली होती. आता एअरलाईनला 23 अब्ज रुपयांची गरज आहे. पीआयएच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की फ्लाइट ऑपरेशनचे निलंबन टाळण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जात आहेत.