इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 06:59 PM2024-10-03T18:59:14+5:302024-10-03T18:59:56+5:30
Iran : आयआरएनएने सांगितले की, विषारी दारू प्यायल्याने जवळपास शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेहरान : इराणमध्ये मिथेनॉलयुक्त विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे. विषारी मिथेनॉलमुळे उत्तरेकडील माजंदरन, गिलान आणि हमादानच्या पश्चिम प्रांतातील विविध शहरे आणि गावांमध्ये पुरुष आणि महिलांचा मृत्यू झाला, असे आयआरएनए या अधिकृत वृत्तसंस्थेने बुधवारी उशिरा वृत्त दिले.
आयआरएनएने सांगितले की, विषारी दारू प्यायल्याने जवळपास शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर कट्टरपंथी इस्लामवादी सत्तेवर आल्यापासून इराणमध्ये दारू बंदी घालण्यात आली आहे. अनेक इराणी बुटलेगर्सकडून दारू खरेदी करतात. तर काही लोक वैयक्तिक वापरासाठी घरी दारू बनवतात. अलीकडच्या काही वर्षांत इराणमध्ये दारू प्यायल्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इराणमधील जवळपास ३०० लोक विषारी दारूमुळे गंभीर आजारी पडले होते. त्याचवेळी ४० जणांचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत दारूबंदी असली तरी त्याचा परिणाम सर्व स्तरापर्यंत इराणमध्ये होताना दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२० मध्ये विषारी दारूमुळे देशात ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.