रासायनिक कंटेनर डेपोतील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, ४५० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:28 AM2022-06-06T05:28:04+5:302022-06-06T05:29:28+5:30
Bangladesh : चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ही आग लागली.
ढाका : बांगलादेशात दक्षिण- पूर्व भागात एका खासगी रासायनिक कंटेनर डेपोत शनिवारी रात्री स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान ४३ लोकांचा मृत्यू झाला, तर ४५०पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे, आग लागल्यानंतर बचाव करायला गेलेलेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ही आग लागली. सरकारी अधिकारी शहादत हुसैन यांनी सांगितले की, शवागृहात आतापर्यंत ४३ मृतदेह आणण्यात आले आहेत. या घटनेत ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील किमान ३५० लोक चटगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५६० डॉलर (५०,००० टका) आणि जखमींना २२४ डॉलर (२०,००० टका) मदत दिली जाणार आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, डेपोमध्ये आग लागली तेव्हा हा रिकामा होता. (वृत्तसंस्था)
नेमके काय झाले...
पोलीस उपनिरीक्षक नुरुल आलम यांनी सांगितले की, कंटेनर डेपोत शनिवारी रात्री ९ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा या ठिकाणी स्फोट झाला आणि आग पसरली. रसायनांमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. रात्री ११.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि कंटेनरमध्ये रसायने असल्याने आग एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये पसरली. या डेपोत कंटेनरमध्ये हाइड्रोजन पेराेक्साइडसारखे अनेक प्रकारचे रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले.
आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमनची १९ वाहने
या स्फोटानंतर घटनास्थळाजवळील घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. चटगाव अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा विभागाचे सहायक संचालक मोहम्मद फारुक हुसैन सिकंदर यांनी सांगितले की, अग्निशमनची जवळपास १९ वाहने आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत होती. तसेच, ६ ॲम्ब्युलन्सही घटनास्थळी हजर होत्या. अग्निशमन सेवेचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल मोहम्मद मैनुद्दीन यांनी सीताकुंड भागात घटनास्थळी पत्रकारांना सांगितले की, या डेपोत कंटेनरमध्ये हाइड्रोजन पॅराक्साइडसारखे अनेक प्रकारचे रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले. बहुतांश जखमी लोकांना सीएमसीएचमध्ये भरती करण्यात आले आहे. अग्निशमनचे कर्मचारी आणि अन्य अनेक जखमींवर एका सैन्य हॉस्पिटलध्ये उपचार सुरू आहेत.