ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबार, एका भारतीयासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:16 PM2024-07-16T21:16:20+5:302024-07-16T21:17:03+5:30

Firing in Oman : या गोळीबारात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चार पाकिस्तानी आहेत.

At least six killed in Oman mosque attack | ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबार, एका भारतीयासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबार, एका भारतीयासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

ओमानची राजधानी मस्कत येथील मशिदीजवळ सोमवारी (१५ जुलै ) जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याची माहिती ओमानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. या गोळीबारात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चार पाकिस्तानी आहेत.

रॉयल ओमान पोलिसांनी ऑनलाइन जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओमानची राजधानी मस्कत येथील वाडी कबीर भागात गोळीबार झाला. मात्र, हा हल्ला कोणी आणि का केला? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अधिकृत आकडेवारीनुसार या गोळीबारात ३० जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करणारे तीन जण होते. ज्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या घटनेत जवळपास चार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३० पाकिस्तानी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

एएफपीच्या रिपोर्टनुसार, या मशिदीला बहुतेक दक्षिण आशियातील स्थलांतरित लोकांनी भेट दिली होती. ओमानमध्ये जवळपास ४ लाख पाकिस्तानी लोकं राहतात, असे ओमानमधील पाकिस्तानचे राजदूत इम्रान अली यांनी सांगितले. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, या दहशतवादी हल्ल्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर मस्कतमधील अमेरिकन दूतावासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमेरिकन नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक बातम्यांचे निरीक्षण करावे. तसेच, नागरिकांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे अमेरिकन दूतावासाने एक्सवरील पोस्टद्वारे म्हटले आहे.

Web Title: At least six killed in Oman mosque attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.