'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने मोठी झेप, 'या' करारानंतर जेट इंजिन देशातच तयार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:10 PM2023-05-31T17:10:35+5:302023-05-31T17:13:50+5:30
India-US Mega Defense Deal: भारत आणि अमेरिका एक मेगा डिफेन्स डील करणार आहेत. दशकभराच्या प्रयत्नानंतर लवकरच दोन्ही देश करारावर स्वाक्षरी करणार
India-US Mega Defense Deal: दशकभराच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात मोठा संरक्षण करार होणार आहे. या करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'च्या स्वप्नालाही बळ मिळणार असून नवे पंख मिळणार आहेत. या करारानंतर प्रथमच फायटर विमानांचे इंजिन म्हणजेच जेट विमाने भारतात बनण्यास सुरुवात होणार आहे. या कराराच्या पुढच्या टप्प्यात मोठ्या जलवाहिन्यांसाठी इंजिन तयार करण्याचा मार्गही देशातच खुला होणार आहे.
या मेगा डिफेन्स डीलमध्ये भारत सरकारचे 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' (HAL) अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (GE) सोबत भागीदारी करार करणार आहे. या करारानंतर दोन्ही कंपन्या स्वदेशी बनावटीचे फायटर जेट इंजिन तयार करतील.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर मोठी घोषणा होऊ शकते!
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींच्या या दौऱ्यात या प्रस्तावित संरक्षण करारावर मोठी घोषणा केली जाऊ शकते. बऱ्याच काळानंतर दोन्ही देशांदरम्यान एवढा मोठा संरक्षण करार होणार आहे. दोन्ही देशांमधील हा सर्वात कायमस्वरूपी संरक्षण करार आहे. सुरुवातीला दोन्ही कंपन्या भागीदारीत लढाऊ विमानाचे इंजिन बनवतील. तर भविष्यात भारतीय नौदलाच्या जहाजांची इंजिनेही या भागीदारीचा भाग बनू शकतात.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पुढील आठवड्यात भारतात येणार!
दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या या करारातील महत्त्वाच्या मुद्यांवर पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे, कारण तेव्हाचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जेम्स ऑस्टिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि जनरल इलेक्ट्रिक यांच्यात सामंजस्य करार केला जाणार आहे आणि दोन्ही कंपन्या त्यांच्या करारातील अटी अंतिम करण्याच्या अगदी जवळ आहेत. यानंतर अमेरिकन सरकार या कराराबद्दल अमेरिकन काँग्रेसला माहिती देईल. यासाठी ३० दिवसांची मुदत असेल. अमेरिकन काँग्रेसला या कराराबद्दल कोणतीही अडचण येण्याची अपेक्षा नाही.
भारतासोबत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले जाईल!
या कराराची विशेष बाब म्हणजे भारतासोबत जेट इंजिन बनवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणार आहे. या संदर्भात फेब्रुवारीमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि अमेरिकन NSA जॅक सुलिव्हन यांच्यातही चर्चा झाली आहे.