पाकिस्तानात अजून एका हिंदू मंदिरावर हल्ला, मूर्तीची केली विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:21 AM2020-01-27T10:21:30+5:302020-01-27T10:24:13+5:30
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. दरम्यान, पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदूमंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये ननकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात सिंध प्रांतामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला करून कट्टरपंथीयांनी मोडतोड केली होती.
या संबंधीची छायाचित्रे पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. ''सिंध प्रांतात अजून एका हिंदू मंदिराची मोडतोड करण्यात आली आहे. थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. अशा घटनांबाबतचे वृत्त नेहमी वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असते. दरम्यान सिंधू प्रंतामध्ये हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याच्या काही घटनासुद्धा घडल्या आहेत.
Yet another Hindu temple vandalised in Sindh. The statue and holy scriptures desecrated as a mob attacked the temple of Mata Rani Bhatiyani in Chachro, Tharparkar. pic.twitter.com/VrKXpi8btd
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) January 26, 2020
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नावरून कायम भारतावर टीका करत असतात. मात्र त्यांच्या स्वत:च्या देशात मात्र अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करणे त्यांना शक्य झालेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिखांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या ननकाना साहीब येथेही दगडफेक झाली होती. त्याविरोधात भारतासह जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.