इराणच्या संसदेवर हल्ला;१२ ठार
By Admin | Published: June 8, 2017 04:24 AM2017-06-08T04:24:56+5:302017-06-08T04:24:56+5:30
इराणची संसद आणि क्रांतिकारी नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मृतिस्थळावर बंदूकधारी आणि आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या भयंकर हल्ल्यांत बुधवारी १२ लोक ठार झाले.
तेहरान : इराणची संसद आणि क्रांतिकारी नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मृतिस्थळावर बंदूकधारी आणि आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या भयंकर हल्ल्यांत बुधवारी १२ लोक ठार झाले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला असून, इसिस अर्थात इस्लामिक स्टेटने याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. दहशतवादी संसद संकुलात दडून बसले होते. सुरक्षा जवानांनी संकुलाला वेढा घातल्यानंतर चकमक उडाली. जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा करून संसद संकुलाला दहशतमुक्त केले.
इसिसने संसद संकुलाच्या आतून हल्लेखोरांचा व्हिडिओ जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला सुरू असताना जबाबदारी स्वीकारण्याची ही दुर्मिळ घटना आहे. पाच तासांच्या चकमकीनंतर हल्लेखोरांचा खात्मा झाला, असे पोलिसांनी सांगितले. इराण सीरिया आणि इराकमध्ये आपल्याविरुद्ध सक्रिय असल्याचे इसिसचे सुन्नी दहशतवादी मानतात. चार दहशतवाद्यांनी सकाळी १० वाजेनंतर तेहरानमधील संसद संकुलावर हल्ला केला. सुरक्षारक्षक आणि आणखी एका व्यक्तीला ठार करून ते संसद संकुलात घुसले. दहशतवाद्यांनी महिलांचा वेश केला होता आणि अभ्यागतांच्या प्रवेशद्वारातून ते संसद संकुलात आले, असे गृहमंत्रालयाचा अधिकारी म्हणाला. साधारणपणे याचवेळी तीन ते चार दहशतवाद्यांचे एक पथक देशाचे क्रांतिकारी नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मृतिस्थळी घुसले. त्यांनी एका माळ्याची हत्या करून इतर अनेकांना जखमी केले. दोन्ही ठिकाणच्या हल्ल्यांत १२ लोक ठार, तर ३९ जखमी झाल्याचे इराणच्या आपत्कालीन सेवेने म्हटले.
खोमेनी यांच्या स्मृतिस्थळी एका महिलेसह दोघांनी स्वत:चा स्फोट घडवून आणला, तर तिसऱ्या आत्मघाती हल्लेखोराने संसद संकुलाच्या चौथ्या मजल्यावर स्वत:ला उडविले.
पोलीस संसद कर्मचाऱ्यांना खिडक्यांतून बाहेर काढत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. सुरक्षा जवानांनी वेढा घातल्यानंतर घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यांना पांगविताना पोलीस मेटाकुटीला आले होते. हल्ला झाला तेव्हा संसद सुरू होती. हल्ल्याने आपण डगमगलो नसून कामकाज नियमितपणे सुरू असल्याचे दाखविण्यास संसद सदस्य उत्सुक होते. आसपासच्या इमारतींमतून गोळीबाराचे आवाज ऐकू येत असताना काहींनी स्वत:वर त्याचा काहीही परिणाम न झाल्याच्या दर्शविणाऱ्या सेल्फी काढून त्या समाजमाध्यमावर पोस्ट केल्या. शहर बंद आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, काही ठिकाणी मेट्रो बंद आहे. पोलिसांनी पत्रकारांना स्मृतिस्थळी जाण्यास मज्जाव केला आहे. देशाच्या सुरक्षा परिषदेची आपण उच्चस्तरीय बैठक बोलावल्याचे गृहमंत्री अब्दोलरहमान फझील यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)