पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बसवर हल्ला; बंदूकधाऱ्यांनी ओळखपत्र पाहून सात जणांवर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:03 IST2025-02-19T12:15:25+5:302025-02-19T13:03:04+5:30
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, एका बसला थांबवण्यात आले आणि त्या बसमधील सात प्रवाशांवर गोळी झाडली. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बस थांबवली, लोकांचे ओळखपत्र तपासले आणि नंतर पंजाब प्रांतातील सात जणांची हत्या केली.

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बसवर हल्ला; बंदूकधाऱ्यांनी ओळखपत्र पाहून सात जणांवर झाडली गोळी
पाकिस्तामधील बलुचिस्तान प्रांतात लाहोरला जाणाऱ्या बसमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सात प्रवाशांची हत्या केली. नैऋत्य बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात हा हल्ला झाला.हल्लेखोरांनी आधी बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे ओळखपत्र तपासली. बसमधील सात जणांवर त्यांनी गोळीबार केला.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेला हा प्रांत पाकिस्तानच्या फुटीरतावादी बंडखोरांविरुद्धच्या दशकांपासून सुरू असलेल्या युद्धातील एक प्रमुख रणांगण आहे.
सुमारे ४० सशस्त्र पुरूषांच्या गटाने अनेक बस आणि वाहने थांबवली, ओळखपत्रे तपासली आणि त्यानंतर बसमधून सात प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व सातही पंजाब प्रांतातील आहेत. या भागाचे सहाय्यक आयुक्त खादिम हुसेन यांनी सांगितले की, बरखानला दक्षिण पंजाबमधील डेरा गाझा खान शहराशी जोडणाऱ्या महामार्गावर हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही आणि हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसराला वेढा घातला आहे पण हल्लेखोर पळून गेले आहेत. शुक्रवारी कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात किमान ११ जण ठार आणि सहा जण जखमी झाल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, फुटीरतावादी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले होते, या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये पोलीस ठाणी, पायाभूत सुविधा आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आले.
बलुच लिबरेशन आर्मीने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. याला त्यांनी "हारुफ" किंवा "डार्क विंडी स्टॉर्म" असे नाव दिले. केंद्र सरकारविरुद्ध लढणाऱ्या अनेक वांशिक सशस्त्र गटांपैकी बीएलए हा सर्वात मोठा गट आहे. बंडखोर गटांनी बलुचिस्तानमधील चिनी नागरिकांना आणि हितसंबंधांनाही लक्ष्य केले आहे.
चीनची पाकिस्तानमधील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक
चीन या प्रांतात असलेले खोल पाण्याचे ग्वादर सागरी बंदर विकसित करत आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ऑफ द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हसाठीच्या ६५ अब्ज डॉलर अंतर्गत बीजिंगने प्रादेशिक विकास प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.