इस्रायलवरील हल्ला; हमासला इराणी मदत; ‘वॉल स्ट्रीट’चा दावा; बेरूतमध्ये शिजला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:32 AM2023-10-11T08:32:38+5:302023-10-11T08:33:24+5:30
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी १९७३ पासून इस्रायलवर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे सर्वांत मोठ्या हल्ल्याची योजना आखण्यासाठी ऑगस्टपासून हमाससोबत काम करत होते.
वॉशिंग्टन : इस्रायलवरील हल्ल्याची तयारी करण्यासाठी व त्याबाबतची योजना आखण्यासाठी इराणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हमासला मदत केली होती. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी बेरूतमध्ये झालेल्या बैठकीत कट शिजला आणि नंतर हल्ल्याला हिरवा कंदील दिला होता, असा दावा अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने हमास आणि हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत केला.
वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी १९७३ पासून इस्रायलवर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे सर्वांत मोठ्या हल्ल्याची योजना आखण्यासाठी ऑगस्टपासून हमाससोबत काम करत होते. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इराणमधील लोकांनीही आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, इराणने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव
- मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत;
- परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापर
हमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.
इस्रायल, पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने
केम्ब्रिज : इस्रायल-हमास संघर्षाचे पडसाद आता जगभर पडत आहेत. विविध ठिकाणी इस्रायल व पॅलेस्टाईन समर्थकांनी त्यांच्या पाठिंब्यासाठी निदर्शने केली. ब्रिटनमधील केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे निदर्शने करत असलेल्या पॅलेस्टाईन समर्थकांचा गट इस्रायल समर्थक गटापुढे आला. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे हजारो इस्रायल समर्थकांनी हमासविरोधात निदर्शने केली.
इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले?
युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धाबाबतची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले की, भारत दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पॅलेस्टाइनला पुतिन यांचा पाठिंबा ?
मध्य पूर्वेबाबत अमेरिका राबवित असलेले धोरण अयशस्वी ठरल्यामुळेच इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष पेटला, अशी टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. इस्रायल व पॅलेस्टाइन या दोघांच्याही संपर्कात रशिया असल्याचे त्यांनी सांगितले.
११ नागरिकांच्या मृत्यूंचा बदला
इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे. युद्धासाठी आणखी शस्त्रे पाठवली जाणार आहेत.
...तर इजिप्तच्या वाहनांवर हल्ला : इस्रायल
इस्रायलने गाझाची ‘संपूर्ण नाकेबंदी’ केली आहे. यात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, अन्न आणि इंधन पुरवठाही थांबवण्यात आला आहे. जर गाझाला इजिप्तने वस्तूंचा पुरवठा केला तर इजिप्तच्या वाहनांवर हल्ला करण्यात येईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
आम्हाला वाचवा
- जीव जाण्याची भीती असलेल्या गाझास्थित भारतीय महिला लुबना नजीर शाबू यांनी मंगळवारी कुटुंबाला त्वरित बाहेर काढण्याची मागणी भारत सरकारकडे केली.