फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 21:26 IST2024-11-08T21:25:45+5:302024-11-08T21:26:12+5:30
फुटबॉल स्टेडिअमच्या शेजारी फिलिस्तानी नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू एम्सटर्डमच्या मेयरनी याला परवानगी दिली नाही, यानंतर हे हल्ले सुरु झाले.

फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
नेदरलँडमध्ये फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला झाला. यामध्ये १२ जण जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखस करण्यात आले आहे. इस्रायल टीमच्या समर्थकांवर स्टेडिअममध्येही हल्ले झाले आणि बाहेरही होत असल्याचे समजते आहे.
युरोप लीगची ही मॅच एजाक्स आणि मकाबी तेल अवीव या संघांमध्ये होत होती. या मॅचच्या सुरुवातीपासूनच गोंधळ आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी ६२ हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अनेक इस्रायली समर्थकांना हल्ल्यातून वाचविले आणि सुरक्षितपणे त्यांच्या हॉटेलवर पोहोचविले आहे.
फुटबॉल स्टेडिअमच्या शेजारी फिलिस्तानी नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू एम्सटर्डमच्या मेयरनी याला परवानगी दिली नाही, यानंतर हे हल्ले सुरु झाले. मॅचवेळी फिलिस्तीन समर्थकांनी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. परंतू तणाव वाढण्याच्या भीतीने पोलिसांनी या लोकांना तिथेच थांबवून ठेवले होते.
या हल्ल्याचा नेदरलँडच्या नेत्यांनी निषेध केला आहे. तसेच इस्रायलने देखील निषेध व्यक्त करत इस्रायल समर्थकांना मायदेशात परत आणण्यासाठी दोन विमाने पाठविली आहेत. नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
या हल्ल्यांनंतर नेदरलँडने यहुदी वस्त्यांची सुरक्षा वाढविली आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी लाखो यहुदी नेदरलँडला पोहोचले होते. प्रसिद्ध एनी फ्रँक आणि तिच्या कुटुंबाने देखील तिथे शरण घेतली होती. यामुळे मोठ्या संख्येने यहुदी लोक अॅमस्टरड़ॅममध्ये राहत आहेत.