Attack on Putin's Car: व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; कारमध्ये अचानक झाला स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 16:59 IST2022-09-15T16:52:50+5:302022-09-15T16:59:36+5:30
Russian President Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लिमोजिन गाडीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Attack on Putin's Car: व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; कारमध्ये अचानक झाला स्फोट
Attack on Putin's Car:रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला झाला आहे. युरो वीकली न्यूजने पुतिन यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गाडीवर हल्ला झाला, पण त्यातून ते थोडक्यात बचावले.
रिपोर्टनुसार, पुतिन त्यांच्या निवासस्थानी परतत होते, त्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा पथकाची पहिली कार थोड्याच अंतरावर एका रुग्णवाहिकेने थांबवली. कार थांबवल्यानंतर पुतिन यांच्या कारच्या डाव्या चाकात मोठा स्फोट झाला. यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरले. मात्र, तोपर्यंत पोलीस सतर्क झाले होते आणि बॉम्ब निकामी पथक आणि बुलेटप्रूफ सुरक्षा दलाने पुतिन यांना तत्काळ सुरक्षा घेऱ्यात घेतले. या घटनेत पुतिन यांचा जीव थोडक्यात बचावला.
पुतिन यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी
पुतिन यांच्या सुरक्षा सेवेतील अनेकांना या गैरप्रकारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पुतिन यांच्या प्रवासाची माहिती लीक झाल्यानंतर त्यांच्या अनेक अंगरक्षकांनाही काढून टाकण्यात आले आहे. पुतिनविरोधी GVR टेलिग्राम चॅनलने दावा केला आहे की, ही घटना झाल्यानंतर पुतिन दुसऱ्या एका सुरक्षेच्या घेऱ्यातून निवासस्थानी पोहोचले. बॅकअप पथकामध्ये 5 सशस्त्र कार होत्या, ज्यामध्ये पुतिन तिसऱ्या कारमध्ये होते.