पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे
By Admin | Published: August 20, 2016 01:27 AM2016-08-20T01:27:24+5:302016-08-20T01:27:24+5:30
इसिसने पॅरिसमध्ये केलेले अतिरेकी हल्ले हे मुंबई हल्ल्याच्या धर्तीवरच होते, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने एका अध्ययनानंतर केला आहे. या अतिरेक्यांनी मुंबईतील
संयुक्त राष्ट्र : इसिसने पॅरिसमध्ये केलेले अतिरेकी हल्ले हे मुंबई हल्ल्याच्या धर्तीवरच होते, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने एका अध्ययनानंतर केला आहे. या अतिरेक्यांनी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा आणि या प्रकारच्या अन्य हल्ल्यांचा अभ्यास केला होता. या माध्यमातून भ्रम निर्माण करण्याचा, तसेच अधिकाधिक लोकांना लक्ष्य करण्याचाही त्यांचा हेतू होता, असेही या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे हा अहवाल ‘अॅनालिटिकल सपोर्ट अॅण्ड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम’कडून सादर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, इसिसच्या अतिरेक्यांनी पॅरिस आणि ब्रसेल्समधील हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करताना जी कार्यप्रणाली अवलंबिली ती विशेष रणनीती होती. कारण, या हल्ल्यांच्या विरुद्ध कारवाई करणे अवघड होऊन जावे, अशीच या अतिरेक्यांची व्यूहरचना होती.
या अहवालात म्हटले आहे की, अतिरेक्यांनी मुंबई हल्ला आणि नैरोबीतील वेस्टगेट शॉपिंंग मॉलमधील हल्ल्यांसह यासारख्याच अन्य हल्ल्यांचा अभ्यास केला होता. अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटच्या (एक्यूआयएस) काही सदस्यांना संयुक्त राष्ट्राच्या दहतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. यातील काही भारतीय वंशाचे सदस्य आहेत. एक्यूआयएसशी संबंधित अफगाणिस्तानातील अल कायदाच्या सदस्यांची संख्या ३०० असल्याचा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे. अफगाणिस्तानात अल कायदाचे समर्थक एक्यूआयएसमध्ये सहभागी झाले आहेत. याचा अध्यक्ष भारतीय वंशाचा मौलाना आसिम उमर आहे. त्याला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. या समूहातील मुख्य अतिरेकी हे पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि मालदीवचे रहिवासी आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.
काय होती घटना?
पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर २०१५ रोजी एका क्रीडा संकुलात, रेस्टॉरंटमध्ये आणि एका कंसर्ट हॉलमध्ये हे हल्ले करण्यात आले होते. मुंबईतील हल्ल्यांसारखीच पद्धत येथे वापरण्यात आली होती. यात १३० जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबई हल्ल्यात १६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.