बांगलादेशात शिया मशिदीवर हल्ला,१ ठार
By admin | Published: November 28, 2015 12:15 AM2015-11-28T00:15:50+5:302015-11-28T00:15:50+5:30
बांगलादेशात शिया मुस्लिमांच्या मशिदीत प्रार्थना करणाऱ्यांवर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले.
ढाका : बांगलादेशात शिया मुस्लिमांच्या मशिदीत प्रार्थना करणाऱ्यांवर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले. हा हल्ला आम्ही केला असल्याचा दावा शुक्रवारी इस्लामिक स्टेटने (आयएस) केला आहे. अल्पसंख्य शिया समुदायावर झालेला व आयएसशी संबंध जोडला गेलेला हा गेल्या काही दिवसांतील दुसरा हल्ला आहे.
अमेरिकेतील एसआयटीई या गुप्तचर गटाने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. उत्तर पश्चिम बोगरा जिल्ह्यातील शिबगंज भागातील शिया मशिदीवर हा हल्ला झाला. आयएसने हा हल्ला आम्ही केल्याचा संदेश टिष्ट्वटरवर टाकला होता. तीन बंदूकधारी सायंकाळी मशिदीत प्रार्थना सुरू असताना घुसले व त्यांनी मशीनगन्समधून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात ७० वर्षांची व्यक्ती ठार तर इमामासह तीन जण जखमी झाले. हल्ला होताच मशिदीचे मुख्य दार आतून बंद करण्यात आले; परंतु हल्लेखोर भिंतीवरून उड्या मारून पळाले. (वृत्तसंस्था)