पाक वंशाचा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या संपर्कात होता
By admin | Published: December 5, 2015 09:10 AM2015-12-05T09:10:42+5:302015-12-05T09:10:42+5:30
कॅलिफोर्नियात पत्नीसह अंदाधुंद गोळीबार करून १४ जणांचा बळी घेणारा पाकिस्तानी वंशाचा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या संपर्कात होता व त्याने दहशतवादाचा मार्ग अनुसरला
वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियात पत्नीसह अंदाधुंद गोळीबार करून १४ जणांचा बळी घेणारा पाकिस्तानी वंशाचा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या संपर्कात होता व त्याने दहशतवादाचा मार्ग अनुसरला असण्याचीही शक्यता आहे. या जोडप्याच्या घरात सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरून ते आणखी एका हल्ल्याच्या तयारीत होते, असे स्पष्ट संकेत मिळतात.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सय्यद रिजवान फारुक (२८) व त्याची पत्नी ताशफीन मलिक (२७) या जोडप्याच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा तेथे शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. यात डझनभर पाईपबॉम्ब आणि हजारो काडतुसांचा समावेश आहे.
सान बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे बुधवारी झालेल्या गोळीबाराच्या चौकशीची जबाबदारी एफबीआयने घेतली आहे. फारूक आणि ताशफीन यांनी हा हल्ला का केला याचे कोडे असून त्याचा उलगडा करण्यासाठी एफबीआय अधिकारी त्यांचे मोबाईल व संगणक तपासत आहेत. एफबीआय या गोळीबाराकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहत आहे. तथापि, ही तपास संस्था हा दहशतवादी हल्ला होता या निष्कर्षाप्रत अद्याप पोहोचलेली नाही.
फारूक पाकिस्तानी वंशाचा होता व ताशफीन पाकिस्तानी नागरिक होता. या जोडप्याने इनलॅण्ड रिजनल सेंटरमध्ये १५० गोळ्यांचा वर्षाव करत मोठा रक्तपात घडवून आणला. नंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे दोघेही ठार झाले. फारूककडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केल्यानंतर हल्ल्याच्या एक दिवस आधी त्याने या उपकरणातील माहिती नष्ट करण्यास सुरुवात केल्याचे आढळून आले. यावरून त्याने अचानक नव्हे, तर पूर्ण तयारीनिशी हल्ला केल्याचे स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फारूक आणि ताशफीन यांच्याकडे असलेली शस्त्रे व दारूगोळा पाहिल्यास ते मोहिमेवर होते हे स्पष्ट आहे. त्यांना हेच करायचे होते की असे काही घडून आले, ज्यामुळे त्यांना असे करणे भाग पडले हे आम्हाला ठाऊक नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
फारूक काही संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याने एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. या व्यक्तीकडे संशयित दहशतवादी म्हणून पाहिले जात आहे. फारूकने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली होती. ताशफीनने इस्लामाबादमध्ये वाग्दत्त वधूचा व्हिसा मिळवला होता. त्यानंतर अमेरिकेत येऊन तिने फारूकशी विवाह केला. या दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, असे फारूकची नातेवाईक असलेल्या फरहान खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
कॅलिफोर्नियातील हल्ला दहशतवादी
कॅलिफोर्नियात झालेला गोळीबार हे
दहशतवादी कृत्य होते, असा दावा राष्ट्राध्यक्षपदाच्या रिपब्लिकन उमेदवारीसाठी रिंगणात असलेले प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
एकंदर परिस्थिती पाहता हा हल्ला वेगळा होता. जिहादी दहशतवाद. पाहा, हल्लेखोरांची नावे पाहा. काय झाले आहे ते पाहा. मला वाटते हा दहशतवाद होता.
समजातील काही वर्गांवर लक्ष ठेवले गेले पाहिजे. काही मशिदींवरही नजर ठेवण्याची गरज आहे, असे ट्रम्प गेल्या काही आठवड्यांपासून म्हणत आहेत.
बंदुकांची खरेदी वैधरीत्या
कॅलिफोर्नियात झालेल्या घातक गोळीबारात वापरण्यात आलेल्या लष्करी पद्धतीच्या बंदुका कायदेशीररीत्या खरेदी करण्यात आल्या होत्या, अशी माहिती अमेरिकन सरकारने दिली.
या संशयितांनी वापरलेल्या बंदुका बेकायदेशीर घोषित करण्यात आलेल्या श्रेणीतील नाहीत. दरम्यान, सिनेटने भीषण गोळीबाराच्या घटनेनंतरही बंदूक खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी अधिक कडक करण्याच्या विरोधात मतदान केले.
1जो मानचिन व पॅट्रिक टूमी या सिनेट सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. असाच प्रस्ताव सिनेटने २०१३ मध्येही फेटाळला होता.