श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते- सैन्यप्रमुखांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:20 AM2019-05-05T06:20:03+5:302019-05-05T06:20:32+5:30
ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.
कोलंबो - ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे.
भारताने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे की, श्रीलंकेला गोपनीय माहिती पुरविली होती. एका महिलेसह ९ आत्मघाती हल्लेखोरांनी २१ एप्रिल रोजी तीन चर्च आणि तीन आलिशान हॉटेलमध्ये हल्ले घडवून आणले. यात २५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले.
इसिसने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे; पण सरकार स्थानिक संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ला जबाबदार ठरवीत आहे. श्रीलंकेने या संघटनेवर बंदी आणली आहे, तर १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. यात एखाद्या विदेशी संघटनेचा हात आहे काय? असे विचारले असता कमांडरनी सांगितले की, ज्या प्रकारे हे स्फोट घडवून आणले त्यावरून बाहेरील शक्तींचा यात हात असावा असे वाटते. (वृत्तसंस्था)
काय म्हणाले सैन्यप्रमुख?
सैन्याचे कमांडर ले. जनरल महेश सेनानायक यांनी सांगितले की, ते संशयित भारतात गेले होते. काश्मीर, बंगळुरू, केरळात गेले होते. आम्हाला याची माहिती मिळाली आहे. काश्मीर, केरळात हे संशयित काय करीत होते? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, प्रशिक्षण आणि देशाबाहेरील अन्य संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी ते गेले होते.