रात्रभर हल्ले सुरूच, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू; जखमींची संख्या ३५००
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 08:47 AM2023-10-08T08:47:38+5:302023-10-08T08:47:45+5:30
Israel-Hamas-War हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते.
पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने शनिवारी अवघ्या २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. गेल्या २४ तासांत या संघर्षात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत ३०० इस्रायली लोक मारले गेले आहेत, तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये २३० लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींबद्दल बोलायचे तर त्यांची संख्या ३५०० च्या वर गेली आहे. याआधी हमासने दावा केला होता की त्यांनी अनेक इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवले होते. अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचीही माहिती आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण इस्रायलच्या काही भागांमध्ये लष्कर अजूनही हमासशी लढण्यात गुंतले आहे आणि देशातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीत, प्रवक्त्याने असेही सांगितले की, हमासने गाझाजवळील इस्रायली शहरांवर शनिवारी केलेल्या अचानक हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक आणि लष्करी जवानांना ओलीस ठेवले आहे.
हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. शत्रूने आमच्यावर केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा नेतान्याहू यांनी हमासला दिला. गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेध
इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात निरपराध लोक व त्यांच्या कुटुंबीयांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, इस्रायलला बिकट परिस्थितीचा सध्या सामना करावा लागत आहे. त्या देशाला भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही मोदी यांनी म्हटले.
इस्रायलमध्ये सध्या किती भारतीय?
इस्रायलमध्ये सध्या १८ हजार भारतीय राहत आहेत. इस्रायलमधील वृद्धांची देखभाल, हिऱ्यांचा व्यापार, माहिती- तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रांमध्ये भारतीय कार्यरत आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिकायला आले आहेत.