हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:38 AM2023-10-25T05:38:14+5:302023-10-25T05:38:42+5:30
७ ऑक्टोबर रोजी हमासने दक्षिण इस्रायलमधील शहरांवर हल्ले करून शेकडो इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले होते.
रफाह : इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या केंद्रांना लक्ष्य करून हल्ले तीव्र केले आहेत. यामुळे गेल्या २४ तासांत तब्बल ७०४ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ओलिस ठेवलेल्या दोन वृद्ध इस्रायली महिलांची हमासने सुटका केली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने दक्षिण इस्रायलमधील शहरांवर हल्ले करून शेकडो इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले होते.
ओलिसांच्या सुटकेसाठी वेळ हवा असल्याने जमिनीवरून कारवाई थांबविण्याचा दबाव अमेरिकेने इस्रायलवर टाकल्याने सध्या जमिनीवरून कारवाई थांबली आहे. त्यामुळेच सध्या इस्रायलने सीमेवर सैन्य थांबवून केवळ गाझावर शक्य तितके हवाई हल्ले सुरू केले आहेत. विविध देशांचे नेते ताकद दाखविण्यासाठी इस्रायलमध्ये येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी तेलअवीव येथे पोहोचले.
पहिल्या दिवशी मारहाण, नंतर उपचार
हमासने ओलिस ठेवलेल्या आणि नंतर सुटका झालेल्या ८५ वर्षीय महिलेने सांगितले की, हमासच्या हल्लेखोरांनी त्यांना पहिल्या दिवशी मारहाण केली आणि नंतर त्यांच्यावर उपचार केले. इस्रायलच्या ओलिस ठेवलेल्या लोकांना गाझातील बोगद्यांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मदत थांबण्याची भीती
गाझावरील हल्ल्यानंतर इस्रायलने सीमा सील केल्या आहेत, ज्यामुळे गाझामधील २३ लाख लोकांना अन्न, पाणी आणि औषधींचा तुटवडा जाणवत आहे. गाझामध्ये इंधन पाठवण्यावर इस्रायलने घातलेली बंदी अजूनही कायम आहे. गाझामधील ट्रकना इंधन न मिळाल्यास मदत वितरण थांबू शकते, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले.
लेबनॉनचे सतत हल्ले
लेबनॉनमधून इस्रायलवर सातत्याने हल्ले होत आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे लेबनॉनवरील हल्लेही तीव्र झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत २० हजार लोक सीमा भागातून इतर भागांत स्थलांतरित झाले आहेत आणि हे प्रमाण वेगाने वाढत आहे.
बराक ओबामांचा इस्रायलला इशारा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्रायलला इशारा देत संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. जर इस्रायलने युद्धात गाझातील नागरिकांच्या मानवतावादी पैलूकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.