कमांडरला टिपण्यासाठी गाझावर हल्ले, ७१ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:26 AM2024-07-14T10:26:04+5:302024-07-14T10:26:29+5:30

२८९ जखमी; शस्त्रसंधीच्या चर्चा पुन्हा थांबण्याची भीती

Attacks Gaza to Kill Commander 71 Died | कमांडरला टिपण्यासाठी गाझावर हल्ले, ७१ ठार

(फोटो सौजन्य - AP)

जेरुसलेम : हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद डेफ याला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने गाझावर शनिवारी केलेल्या हल्ल्यात सुमारे ७१ जणांचा मृत्यू तर २८९ जण जखमी झाल्याचा दावा गाझातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. मृतांमध्ये डेफ याचा समावेश आहे का, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र हा कमांडर मारला गेल्यास इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या चर्चेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

मोहम्मद डेफचा मृतांमध्ये समावेश नसल्याचे हमासने म्हटले आहे. हमासचा आणखी एक कमांडर राफा सलामा याचाही खात्मा करण्याचा इस्रायलचा विचार होता. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून १२०० लोकांची हत्या केली. 

‘डेफ मारला गेलेला नाही’

हमासने म्हटले आहे की, डेफ हल्ल्यात मारला गेल्याच्या चर्चेत तथ्य नाही. इस्रायलकडून सुरु असलेला नरसंहार झाकण्यासाठी या चर्चा होत असतात. शनिवारी हल्ल्यात २८९ जण जखमी झाले, अशी माहिती गाझातील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हे युद्ध संपुष्टात आणावे म्हणून अमेरिका तसेच युरोपीय देशांनी केलेली मागणी इस्रायलने अमान्य केली होती. हमासचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असेही इस्रायलने म्हटले होते. 

दहशतवादी नागरी वस्त्यांत दडले 

इस्रायलने दावा केला की, हमासचे दहशतवादी हे मागील अनेक महिन्यांपासून नागरी वस्त्यांमध्ये लपून बसले आहेत. परंतु तिथूनही ते आपल्या घातपाती कारवाया चालवित आहेत. गाझामध्ये शनिवारी मोठा हल्ला करण्यात आला.
  
हल्ला केलेला भाग इमारती, झाडांनी वेढलेला आहे. इस्रायलने केलेल्या बॉम्बच्या हल्ल्यांनंतर गाझातील त्या भागात जळालेले तंबू, कार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Attacks Gaza to Kill Commander 71 Died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.