"बांगलादेशच्या हिंदूंवरील हल्ल्यांना खूप वाढवून सांगितलं जातंय, घडतंय ते चूक आहे, पण.."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:12 PM2024-09-05T16:12:28+5:302024-09-05T16:15:21+5:30
Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केला मोठा दावा
Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातीलहिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना मोठा दावा केला. या गोष्टींना मुद्दामून वाढीव पद्धतीने दाखवले जात आहे असा दावा त्यांनी केला. यासोबतच भारतात या घटना कशाप्रकारे दाखवल्या जात आहेत, त्या माध्यमांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केले. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हा जातीय मुद्दा नाही, याला राजकीय वळण दिल जात आहे. मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले आहे की हा मुद्दा मूळ प्रमाणापेक्षा अतिशयोक्तीने वाढवला जात आहे. या घटनांना विविध मुद्द्यांच्या छटा आहेत.
"जेव्हा शेख हसीना आणि अवामी लीग यांच्या अत्याचारानंतर देश अशांत होता, तेव्हा जे लोक त्यांच्यासोबत होते त्यांनाही हल्ल्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर काहींनी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना हिंदूंना मारहाण केली, कारण बांगलादेशातील हिंदू म्हणजे अवामी लीग समर्थक असा समज आहे. जे घडले ते योग्य आहे असे मी अजिबात म्हणत नाही, पण काही लोक या गोष्टींचा गैरवापर करत आहेत."
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार झाल्यानंतर लगेच युनूस यांनी गेल्या महिन्यात नवी दिल्लीशी संपर्क साधला होता. त्यांच्या पहिल्या थेट संपर्कात युनूस यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की ढाकामधील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक गटांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाची पुष्टी केली आणि हिंसाचारग्रस्त देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर दिला.
मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, बांगलादेश हा इतर देशांप्रमाणेच दुसरा शेजारी आहे. मी हिंदू समुदायाच्या सदस्यांना भेटलो तेव्हाही त्यांना हिंदू म्हणून ओळख देऊ नये अशी विनंती केली होती. त्यापेक्षा तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला समान अधिकार आहेत असे म्हणायला सांगितले होते. नागरिक म्हणून तुमचे कायदेशीर अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही, असेही ते म्हणाले होते.