सुदानमधील सैन्याकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; गोळीबारात 35 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 09:52 AM2019-06-04T09:52:03+5:302019-06-04T09:53:48+5:30
सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांविरोधात सक्तीने वागण्याची धमकी दिली आहे.
खार्तूम : ऑफ्रिकन देश सुदानच्या राजधानीमध्ये सत्ताधारी सैन्य साशकांविरोधात सेना मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सेनेद्वारे गोळीबार करण्यात आला. यामध्ये कमीतकमी 35 जण ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनुसार सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तंबू जाळून टाकण्यात आले.
या हल्ल्यानंतर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांविरोधात सक्तीने वागण्याची धमकी दिली आहे. हे आंदोलक गेल्या महिनाभरापासून मुख्यालयाबाहेर तळ ठोकून आहेत. मात्र, सोमवारी सैन्याने आंदोलक राहत असलेली जागा रिकामी करण्याचा प्रयत्न सुरु केल्यानंतर आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
तर दुसरीकडे सैन्य परिषदेच्या प्रमुखांनी आंदोलकांच्या नेत्यांना जबाबदार धरले आहे. जनरल अब्देल फतह बुरहान यांनी सांगितले की, पऱिषद आंदोलकांसोबत झालेले सर्व सामंजस्य करार रद्द करत आहे. आणि सात महिन्यांच्या आत देशामध्ये निवडणुका घेणार आहे.