चीनकडून बांगलादेशला चुचकारण्याचे प्रयत्न, व्यापार वाढविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:56 AM2020-06-22T01:56:25+5:302020-06-22T01:56:55+5:30
भारताबरोबर असलेले संबंध ताणले गेल्यानंतर चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी भारतातून जोरदार मागणी होत आहे.
ढाका : बांगलादेशकडून चीनला आयात होणाऱ्या ९७ टक्के वस्तूंवरील आयात शुल्क शून्य टक्के करून चीनने बांगलादेशला खुश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे चीनचा बांगलादेशबरोबर असलेला व्यापार वाढणार असून, त्यांचा लाभ चीनला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एक महिन्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्याशी कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय व्यापार मजूबत करण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेला अनुसरून येत्या १ जुलैपासून बांगलादेशमधून चीनला पाठविल्या जाणाºया ९७ टक्के वस्तूंवरील शुल्क शून्य टक्के करण्याची घोषणा चीनने केली आहे. यामुळे या दोनी देशात सौहार्दाचे संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताबरोबर असलेले संबंध ताणले गेल्यानंतर चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी भारतातून जोरदार मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णायाला महत्त्व आहे.
> दोन्ही देशांना होणार लाभ
आशिया-प्रशांत क्षेत्राच्या व्यापार करारानुसार आतापर्यंत बांगलादेशच्या ३०९५ वस्तूंना चीनमध्ये कोणतेही शुल्क लागत नव्हते. येत्या १ जुलैपासून ही संख्या ८२५६ एवढी वाढविण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशला निर्यात वाढविण्यात यश येणार असून, चीनला बांगलादेशकडून स्वस्त दरात विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना लाभ होणार असल्याचे सांगण्यात येते.