आॅस्ट्रेलियात वणवा; शंभरावर घरे खाक
By admin | Published: December 27, 2015 12:18 AM2015-12-27T00:18:20+5:302015-12-27T00:18:20+5:30
आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ऐन नाताळच्या दिवशी वणवा (जंगलातील आग) भडकून १०० घरे खाक झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याई रिव्हर भागात
सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ऐन नाताळच्या दिवशी वणवा (जंगलातील आग) भडकून १०० घरे खाक झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याई रिव्हर भागात ९८, तर सेपरेशन क्रीकमध्ये १८ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. व्हिक्टोरियाच्या नैऋत्येकडील ग्रेट ओशन रोडलगत हा वणवा भडकला असून, तो काबूत आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. पावसाच्या सरी कोसळून वातावरण थंड झाल्यामुळे वणव्याची धोकादायकता मोठ्या प्रमाणात घटली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सतर्कतेची पातळी कायम ठेवण्यात आली आहे.
वाऱ्याची दिशा बदलून आग शहराच्या दिशेने सरकेल, अशी भीती निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी लोकप्रिय पर्यटनस्थळ लोर्ने येथील १,६०० पर्यटक आणि रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तथापि, धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना शनिवारी परतण्याची मुभा देण्यात आली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५०० अग्निशमन कर्मचारी, ६० बंब आणि १८ विमाने तैनात करण्यात आली आहेत. हा फौजफाटा अहोरात्र काम करीत आहे, असे व्हिक्टोरिया आपत्कालीन व्यवस्थापन आयुक्त क्रेग लॅपस्ले यांनी सांगितले. वणव्याचा तात्काळ धोका दूर झाला असला तरी या आगीत अनेक आठवडे धगधगण्याची क्षमता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.