धक्कादायक... ऑस्ट्रेलिया सरकार १० हजार उंटांना गोळ्या झाडून ठार करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:03 PM2020-01-08T12:03:35+5:302020-01-08T12:37:00+5:30
भीषण आगीसह तेथे पाणी समस्याही गंभीर बनलीय. जास्त पाणी पितात म्हणून दक्षिण
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले. ही आग आटोक्यात आणण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं पीडितांना मदत करत आहे. तसेच, तेथील प्राणी अन् पक्षांचा जीव वाचिवण्यासाठीही धडपड होत आहे. मात्र, दुसरीकडे दक्षिण ऑस्ट्रेलियात तब्बल 10 हजार उंटांची हत्या करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियातील विध्वंसक आगीत स्टीव्ह आयर्विन या वन्यप्रेमीच्या कुटुंबाने तब्बल 90 हजार प्राण्यांचा जीव वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व प्राणी एकाच कुटुंबाने वाचवल्यामुळे अनेकांनी त्यांचे भरभरुन कौतुक केलं आहे. आयर्विन यांच्याप्रमाणेच इतरही नागरिक तेथील प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, येथील दक्षिण ऑस्ट्रेलियात तब्बल 10 हजार उंटांची हत्या करण्यात येत आहे. तेथील सरकारने 5 दिवसांचे अभियान राबवले असून आजपासून त्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारने या उंटांच्या हत्येसाठी हेलिकॉप्टरही रवाना केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.
ऑस्ट्रेलियात भीषण आगीसह तेथे पाणी समस्याही गंभीर बनलीय. त्यामुळे, जास्त पाणी पितात म्हणून दक्षिण ऑस्ट्रेलियात 10 हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात येत आहे. एका इंग्रजी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत आहेत, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती. दक्षिण ऑस्ट्रेलियात पाण्याची गंभीर समस्या असून जंगलातून उंट मानवी वस्तीत येत. त्यामुळे, नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत संबंधित विभागाने व्यावसायिक शुटर्संना उंटांना गोळा घालण्याचे आदेश दिले. या शुटर्संनी हॅलिकॉपटरमधून गोळ्या घालत 10 हजारहून अधिक उंटांना ठार करण्याचं मिशन ठेवलं आहे. एकीकडे तिथेत प्राण्यांना वाचविण्यासाठी ऑस्ट्रेलियन जीवाचं रान करत आहेत. त्यातच, अशातच मानव स्वत:च्या हाताने उंटांना संपवत असल्याने संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही ऑस्ट्रेलियातील पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे आणि आता त्यात टेनिसपटूंचाही समावेश झाला आहे. दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी सामाजिक भान राखताना पुनर्वसनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.