ऑस्ट्रेलियामध्ये १० हजार उंट मारणार; ९० हजार वन्यप्राणी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 06:30 AM2020-01-09T06:30:04+5:302020-01-09T06:30:07+5:30
ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांना लागलेल्या भीषण वणव्यामध्ये ५० कोटींहून अधिक वन्यप्राणी मरण पावल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे;
मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांना लागलेल्या भीषण वणव्यामध्ये ५० कोटींहून अधिक वन्यप्राणी मरण पावल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे; पण त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण आॅस्ट्रेलियातील १० हजार उंटांना गोळ्या घालून ठार मारण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. उंटांना ठार मारण्याची मोहीम पाच दिवस राबविण्यात येणार आहे.
वणव्यात अडकलेल्या, होरपळलेल्या, गुदमरलेल्या आणि जखमी झालेल्या वन्यप्राणी व पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथील स्थानिक नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. स्टीव्ह आयर्विन व त्यांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत ९० हजार प्राणी व पक्षी यांचे जीव वाचविले आहेत. त्यामुळे त्यांचे जगभरात कौतुक होत असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ न आॅस्ट्रेलियातील इतर लोकही प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत; पण याच काळात दक्षिण आॅस्ट्रेलियातील १० हजार उंटांची हत्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सरकारच्या या मोहिमेवर जगभरातील प्राणीप्रेमींनी टीका केली आहे. उंटांच्या हत्येसाठी हेलिकॉप्टर रवाना केले असल्याचे वृत्त
आहे.
ऑस्ट्रेलियातील काही भागांत सध्या दुष्काळ असून, पाण्याचेही प्रचंड दुर्भिक्ष आहे. अशा वेळी उंट फार पाणी पितात आणि लोकांना त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते, हे कारण पुढे करून उंटांच्या हत्येची मोहीम हाती घेण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. जंगलांमध्ये पाण्याचे साठेच शिल्लक नसल्याने नागरी वस्त्यांत येऊ न उंट पाणी संपवत आहेत, अशी दक्षिण आॅस्ट्रेलियातील स्थानिकांची तक्रार आहे. या तक्रारींची दखल घेत उंटांना गोळ्या घालून ठार मारण्याच्या सूचना सरकारच्या संबंधित विभागो व्यावसायिक शूटर्सना दिल्या आहेत. हेलिकॉप्टरमधून उंटांना गोळ्या घालण्यात येणार आहेत. एकीकडे वणव्यामुळे वन्यप्राणी व पक्षी नामशेष होत आहेत, तर दुसरीकडे उंटांना मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांनी आॅस्ट्रेलियावर दबाव आणून ही मोहीम थांबवायला भाग पाडावे, अशी मागणी विविध देशांतील प्राणीप्रेमींनी सुरू केली आहे.
>आगीचे लोण अर्जेंटिना, चिलीपर्यंत
सध्या आॅस्ट्रेलियातील काही भागांत प्रचंड उन्हाळा असून, तापमान ५0 अंश सेल्शियसच्या घरात गेले आहे. त्यातच खुरटी जंगलांना लागलेल्या आगीमुळे ते वाढले आहे. पर्यावरणासाठी प्रयत्न करण्याच्या मोहिमेची पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी खिल्ली उडवली होती.
आताच्या जंगलांना ज्या भयावह आगी लागत आहेत, त्याला वातावरणातील बदल अजिबात कारणीभूत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे; पण आॅस्ट्रेलियातील आग आता अर्जेंटिना व चिली या देशांतील जंगलांत पोहोचली आहे.