ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 12:54 PM2024-05-05T12:54:58+5:302024-05-05T12:55:29+5:30
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील या खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला.
ऑस्ट्रेलियातील महिलाखासदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून गंभीर आरोप केले आहेत. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील या खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, जबरदस्तीने अंमली पदार्थांचे सेवन करायला लावले आणि मग अत्याचार करण्यात आला. ब्रिटनी लॉगा या ऑस्ट्रेलियात सहाय्यक आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, एकदा त्या त्यांचा मतदारसंघ येप्पूनमध्ये असताना त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला. हे असे कोणासोबतही होऊ शकते आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकांसोबत असे घडते.
३७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खासदाराने लैंगिक छळ केल्याप्रकरणी २८ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर त्यांना इस्पितळात देखील दाखल करण्यात आले. टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील पोलीस अधिक तपास करत आहे. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या शरीरात अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली, जे त्यांना देण्यात आले होते. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत खुलासा केला आहे.
ब्रिटनी लॉगा यांनी आणखी सांगितले की, ड्रग्जचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम झाला आणि त्यांचा ड्रग्ज देण्यात आलेल्या इतर महिलांशी संपर्क साधला गेला. क्वीन्सलँड पोलिसांनी टेलिग्राफला सांगितले की, ते येप्पूनमधील एका घटनेशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची चौकशी करत आहेत. पण, कोणाला याबाबत अधिक माहिती मिळाल्यास लगेच संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.