'ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे हवाई सेवेने थेट मुंबईशी जोडणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:12 PM2018-08-06T17:12:40+5:302018-08-06T17:14:08+5:30
मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संसदीय शिष्टमंडळ प्रयत्न करेल
मुंबई - मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संसदीय शिष्टमंडळ प्रयत्न करेल असे आश्वासन ऑस्ट्रेलियन संसदेच्या संधी व करारविषयक संयुक्त स्थायी समितीचे अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिले. स्टुअर्ट रॉबर्ट यांच्या अध्यक्षतेखाली संसद सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. ऑस्ट्रेलियाने भारताशी आर्थिक सहकार्य वाढविण्याकरिता शिक्षण, कृषीव्यवसाय, पर्यटन, उर्जा, आरोग्य, पायाभूत सुविधा यांसह दहा क्षेत्रे निर्धारित केली आहेत.
ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 24 दशलक्ष इतकी असली तरीही ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था जगात बाराव्या क्रमांकाची असून भारत हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा भागीदार आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. जवळ जवळ 80 हजार भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपैकी 7 लाख लोक मुळचे भारतीय आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील संबंध वाढविणे गरजेचे असल्याचेस्टुअर्ट रॉबर्ट यांनी सांगितले. संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना, महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर राज्य असून थेट प्रवासी विमानसेवेसोबतच थेट मालवाहू विमानसेवा सुरु झाल्यास फलोत्पादन निर्यातीस चालना मिळेल. महाराष्ट्रात पर्यटनाची अनेक वैविध्यपूर्ण स्थळे असून थेट विमानसेवेमुळे ऑस्ट्रेलियातून अधिक पर्यटक महाराष्ट्राला भेट देऊ शकतील, असेही राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्स या राज्यांमध्ये सामंजस्य करार असून ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्राला क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सांसदीय समितीचे सदस्य मिशेल डयांबी व श्रीमती नोला मेरीनो आणि ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत टोनी ह्यूबर यांसह इतर सदस्य उपस्थित होते.